कोणत्याही भागाचा विकास व्हायचा असेल तर त्या भागाच नेतृत्व करणाऱ्याकडे व्हीजन असावे लागते. स्वप्न पहावी लागतात. आणि त्या स्वप्नांची पुर्तता होण्यासाठी त्याचा पाठपुरावा करावा लागतो. पश्चिम महाराष्ट्रात विकासाची गती वाढली त्याच कारण त्या भागातील जनतेनेही नेतृत्वावर विश्वास टाकला, नेहमी सहकार्याचीच भुमिका घेतली. केवळ त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात सहकार रूजला आणि सहकार बहरला.

त्यातून साखर उद्योग उभा राहिला. दुधाची क्रांती घडली. प्रत्येक कुटुंबात उदरनिर्वाहाच साधन निर्माण झालं. हे होत असतानाच तेथे पिकणाऱ्या सर्व फळ आणि भाजीपाल्याला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना झाली. याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला चांगला दर मिळू लागला. मार्केटयार्ड हे पश्चिम महाराष्ट्रात शेतीमाल उलाढालीचे एक फार मोठं माध्यम आहे.कोकणात सहकार आजही चाचपडतोय सहकारात काम करणार्यांवर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे.आणि सहकारात काम करणाऱ्यानी विश्वासार्हता निर्माण करावी लागेल परस्परांमध्ये हे घडल पाहिजे.कोकणातही आंबा, काजू, कोकम, जांभूळ, पालेभाजी मोठ्याप्रमाणावर उत्पादित होते. आंबा इतक्या वर्षानंतरही नवी मुंबईच्या मार्केटमध्ये रूमालाआडच दलाल त्याचा सौदा करतात. दलाल ठरवणार तोच दर. आंबा, काजू बागायतदाराला त्याची कोणतीही किंमत नाही अशी स्थिती. कोकणातील शेती, बागायतदार कधीच संघटीत झाला की त्याने हा विचारही कधी केला नाही. सदासर्वकाळ राजकिय ‘गजाली’मध्ये रमणारा कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यानेही कधीही आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या कृषीमालासाठी मार्केटयार्ड ची आवश्यकता आहे हा विचारच कधी केला नाही. परंतु हा विचार मात्र माजी केंद्रियमंत्री कोकणचे खा.नारायण राणे यांनी केला. कोकणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केटयार्ड उभारले गेले पाहिजे हा गेलेकाही वर्षे त्यांचा प्रयत्न होता. सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांना कोणत्याही स्थितीत मार्केटयार्ड उभं झालं पाहिजे अशी चर्चा होत असताना या मार्केटयार्डला मुहर्तस्वरूप आणण्यासाठी खास प्रयत्न केले ते आ.नितेश राणे यांनी मार्केटयार्डसाठी आवश्यक असणारी जागा कशी उपलब्ध करायची अशा अनेक प्रश्नांची मालिका समोर असताना आ.नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन परिसराची जागा निश्चित केली. नांदगाव रेल्वेस्टेशनला रो-रो रेल्वे सेवेचा थांबा आहे. नांदगाव हे त्या अर्थाने मध्यवर्ती आहे. महामार्गाच्या जवळच रेल्वेस्टेशन आहे. नांदगाव-कोल्हापूर रेल्वे वाहतुकही भविष्यात याच रेल्वेस्टेशनने होणारे आहे. मार्केटयार्ड उभारणीसाठी आर्थिक सहाय्य करणारच. परंतु त्यासाठी जमिन उपलब्ध असणे आवश्यक आहे. यात खऱ्याअर्थाने महत्वाची भुमिका बजावण्यात आली ती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतली. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, आ.नितेश राणे आणि बँकेच्या सर्व संचालकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उभारत असलेल्या मार्केटयार्ड उभारणीसाठी आवश्यक असणारी जमिन खरेदी करण्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य केले. सिंधुदुर्ग बँकेने खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी उचलेल हे मोठं पाऊल आहे. विकासावर केवळ बोलून, चर्चा करून विकास होत नाही. विकास हा कागदावरचा व प्रत्यक्ष साकारलेला, दिसणारा आणि सर्वसामान्यांना लाभ घेता येणारा विकास. तर नांदगावच्या मार्केटयार्डच्या निमित्ताने कोकणच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. या मार्केटयार्डमध्ये जी उभारणी होणार आहे त्यातून आंबा, काजू, भात, मासळी, सुपारी, केळी, कलिंगड, पालेभाज्या, अंडी, कोंबड्या, मेंढ्या, बकरे, बांबू, जळाऊ लाकुड, इमारती व खैराचे लाकुड, भुईमूग, नारळ, कडधान्य, चवळी, हरभरा, तेल आदी अनेक वस्तूंचे नियमन झालेले आहे. कोकणातील उत्पादित होणारा सर्व भागातील शेतीमाल मार्केटयार्डात यावा लागेल. आंबा पिकविण्यासाठी रायपनिंग चेंबर्स, पॅकहाऊस, लिलास्थळ, शितगृह, भात आणि काजू बी करीता गोदामे असतील. वजन काटे, मासळी व इतर जलचर प्राण्यांसाठी बर्फ कारखाना याशिवाय जनावरांचा बाजारही याठिकाणी असणार आहे. शेतकऱ्यांसाठी निवासी व्यवस्था असणार आहे. या मार्केटयार्डमध्ये काम करणाऱ्या हमालांसाठी सर्वसोईनियुक्त रहाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या मार्केटयार्डमध्ये करण्यात येणार आहे. आजवर आंबा दलाल आणि काजू बी खरेदी करणारे व्यापारी म्हणतील तो दर बागायतदार शेतकऱ्याला दिला जात होता. त्याचबरोबर कोकणात जो शेतकरी शेतीमाल उत्पादित करेल त्यासाठी त्याला विक्री व्यवस्थेच स्वत:च हक्कांच मार्केट सिंधुदुर्गात उपलब्ध होत आहे. आ.नितेश राणे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केटयार्ड उभे राहिले पाहिजे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहिले. ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी करत पाठपुरावा करत राहिले. यामुळे सिंधुदुर्गासाठी मार्केटयार्डला मान्यता देण्यात आली. खरंतर कोणतीही गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते. दोष दाखवण फार सोप त्यासाठी काहीच करावं लागत नाही. कोकणात तर त्यात आपला हातखंडाच असतो. परंतु विकासाचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करण तस कठीण असत. कारण प्रोत्साहन देणाऱ्यांपेक्षा सेंटीमिटरने माफ काढणाऱ्यांच्या हो-ला-हो म्हणणारे अधिक. परंतु सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजारसमितीचे उभं रहाणारे मार्केटयार्ड झालं पाहिजे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे हे देखिल यासाठी आ.नितेश राणे यांच्यासोबत सतत भेटून प्रयत्न करीत राहिले. नांदगाव रेल्वेस्टेशन नजिक हे मार्केटयार्ड उभारल्याने सर्व बागायतदार, शेतकऱ्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असणार आहे. कोकणातील बागायतदार, शेतकऱ्यांनी या निर्माण होणाऱ्या मार्केटयार्डच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रात त्या-त्या जिल्ह्यांच्या असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मार्केटयार्डातून शेतमालाच्या विक्री व्यवस्थेमुळेच समृद्धी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचू शकली. कोकणात सहकार उभा रहात नाही. सहकार्य केलं जात नाही. असं जे काही म्हटल जात हे पुसून टाकण्याची मोठी संधी कोकणातील शेतकऱ्यांना या सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डातून निर्माण झाली आहे. परस्परातील विश्वास आणि सहकार्य यातूनच विकासाची गंगा शेतकऱ्याच्या दारापाशी जाईल. सिंधुदुर्गात आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग नांदगाव येथील निर्माण होणाऱ्या मार्केटयार्डातूनच गावो-गावी पोहचू शकेल. फक्त नकारात्मकता फेकून दिली पाहिजे. सकारात्मकतेने विचारानेच हा नवा विकासाचा मार्ग नवीदृष्टी देवो हिच अपेक्षा.











