
तालुक्यातील भू गावातून शेतकरी, मच्छिमार बांधवांचा एल्गार
राजापूर (वार्ताहर): समृद्ध कोकण संघटनेच्या वतीने गुरूवार पासून बेमुदत आंदोलनाची सुरुवात तालुक्यातील भू गावातून करण्यात आली. जो पर्यंत शेतकरी व मच्छीमारांचे प्रश्न सुटत नाहीत तसेच शेतकरी व मच्छीमारांना योग्य तो हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा ईशारा समृद्ध कोकण स्वराज्य भूमी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कोकणातील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, पर्यटन विकास या न्याय हक्कासाठी व मागण्यांसाठी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली हे स्वराज्यभूमी आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
गुरुवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून हे साखळी उपोषण आंदोलन सुरू झाले आहे. दि.२२,२३,२४ या तीन दिवसांमध्ये भू, खिणगिणी या गावांमध्ये हे आंदोलन सुरू राहणार असून. येणाऱ्या २६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीवर मोर्चा काढण्यात येणार असून या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे.
जोपर्यंत मच्छीमार व शेतकरी संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असून जर का या आंदोलनाचा सरकारने योग्य तो विचार केला नाही तर मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात येईल असा देखील इशारा समृध्द कोकण संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात भू दशक्रोशीतील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.












