दापोली उपजिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुक केंद्राचे उद्या नव्याने उद्घाटन

 

दापोली | प्रतिनिधी: गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या दापोली उपजिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुक केंद्र अखेर नव्याने उद्घाटन समारंभ दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1.30 वाजता दापोली विधानसभेचे लोकप्रिय आ. योगेश कदम यांचे शुभहस्ते, जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून दापोली उपजिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुक केंद्र बंद अवस्थेत असल्याने दापोली तालुक्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तकरिता महाड, खेड, चिपळुण अथवा डेरवण येथे जावे लागत होते, परंतु गेल्या दोन वर्षापासुन दापोलीमध्ये संतोष अबगुल प्रतिष्ठानने मैत्रेय फाउंडेशन- सायन ब्लड बँकेच्या सहाय्याने खाजगी दापोली ब्लड स्टोअरेज सेंटर आणुन लोकांची होणारी तारांबळ व वेळेची बचत करत आहेत. दापोली उपजिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुक केंद्र बंद होऊन सुमारे ८-१० वर्ष झाली असुन प्रदिर्घ कालखंडानंतर दापोली विधानसभेचे लोकप्रिय आ. योगेश कदम यांच्या प्रयत्नाने पुन्हा नव्याने रक्त साठवणुक केंद्र चे उद्याटन होणार आहे. यामुळे दापोली मधील जनतेला आता रक्तासाठी दापोलीच्या बाहेर इतरत्र कुठेही जावे लागणार नाही. दापोली उपजिल्हा रुग्णालयाबरोबरच टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील बंद अवस्थेतील उपजिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुक केंद्र चालू करण्याचे काम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिक्षक, अधिकारी कर्मचारी करीत आहे. जिल्ह्यात रुग्णांना आवश्यक असणारे रक्ताच्या बॅगा व ब्लड कॅम्पव्दारे मिळणाऱ्या बॅगा यांचे व्यस्त प्रमाण असल्याने जिल्हा रुग्णालयात जाणवणारा रक्ताचा तुटवडा भरुन काढणे तसेच जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांच्या रक्त साठवणुक केंद्राला करावा लागणारा रक्ताचा पुरवठा म्हणजे तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्याच्या शासकीय रक्तपेढी हीच जिल्हयाची मदर बॅक असल्याने सर्वच उपजिल्हा रुग्णालयांना रक्तपुरवठा करावा लागणार आहे.

दापोली उपजिल्हा रुग्णालयात गेली अनेक वर्ष जनरल सर्जन, एम.डी मेडिसिन, स्त्री-रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भुलतज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ आदी सर्वच पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे गरोदर मातांसाठी सोनोग्राफी ही आठवड्यातुन एकच दिवस केली जाते. स्त्री रोग तज्ञ नसल्याने गरोदर मातांची होणारी हेळसांड, त्याचप्रमाणे आयसीयु विभाग बंद असल्याने व तज्ञ डॉक्टरांची सर्वच पदे गेली अनेक वर्ष रिक्त असल्याने रुग्णांना इतर खाजगी तसेच डेरवण, मुंबई, पुणे, कोल्हापूर सारख्या ठिकाणचा रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. शासकीय ब्लड स्टोअरेज बरोबरच दापोली उपजिल्हा रुग्णालयात सर्वच प्रकारचे तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध व्हावे अशी मागणी दापोलीकर करीत आहे.