दापोली नगरपंचायतीवर शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसेल : ना. योगेश कदम

दापोली l प्रतिनिधी:- नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या वेळी शिवसैनिकांनी केलेला संघर्ष आज फळास आल्याने लवकरच दापोली नगरपंचायतीवर शिवसेनेचाच नगराध्यक्ष असेल, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.

दापोलीमध्ये आज १८ फेब्रुवारी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली नगरपंचायतीच्या ५ नगरसेवकांनी वेगळा गट करून शिवसेनेमध्ये मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, नगरपंचायतीच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस आपल्या शिवसैनिकांनी संघर्ष केला होता. त्यावेळेस जो काय अन्याय झाला त्याला वाचा फोडण्याचे काम शिवसैनिकांनी केलं. त्यावेळेस नगरपंचायतीमध्ये आपण सत्ता स्थापन करू शकलो नाही. त्यावेळेस निवडून गेलेले अपक्ष म्हणून आपले दोन नगरसेवक आज नगरपंचायतमध्ये आहेत. दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष व्हावा यासाठीचा केलेला संघर्ष आज फळास आला आहे. नगराध्यक्ष आपला होण्याच्या दृष्टीने आज या पाचही नगरसेवकांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन यावेळी योगेश कदम यांनी केले.

कोणतीही अपेक्षा न ठेवता निव्वळ दापोली शहराचा जो विकास थांबला आहे तो होणे आवश्यक आहे. येणारा निधी जो थांबला आहे तो ताबडतोब येऊन विकासकामांना सुरुवात करणे गरजेचे आहे. याकरिता या पाच नगरसेवकांनी आज प्रवेश केला आहे. आपले पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तसेच महायुतीच्या माध्यमातून एकजुटीने या शहराचा विकास करायचा आहे. त्याकरिता मी मंत्री म्हणून नेहमीच तुमच्या पाठीशी उभा आहे ; अशी ग्वाही यावेळी मंत्री योगेश कदम यांनी यावेळी दिली.

_______________________________________

“ज्यावेळी आम्ही उबाठा मध्ये प्रवेश केला त्यावेळेस आम्हाला वाटले की, कुठेतरी आमच्या विभागामध्ये कामे होतील परंतु एकही काम आजपर्यंत होऊ शकले नाही. आपले दापोलीचे आमदार आणि राज्याचे मंत्री योगेश कदम यांच्या तालुक्यातील कामांचा झपाटा पाहून आम्ही ठरवलं की, आपल्या विभागांचा विकास व्हायला हवा असेल तर आपल्याला मंत्र्यांसोबत गेलं पाहिजे म्हणून आम्ही दुसरी कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त विकासकामांसाठीच हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे; असे दापोली नगरपंचायत नगरसेवक विलास शिगवण यांनी यावेळी सांगितले.

______________________________________