लांजा (प्रतिनिधी) बीएसएनएल मोबाइल टॉवरची सेवा बंद पडल्याने तालुक्यातील साटवली गाव गेले तीन दिवस नॉट रीचेबल झाले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .
तालुक्याच्या पश्चिम भागातील साटवली या ठिकाणी बऱ्यापैकी बाजारपेठ असून पोस्ट ऑफिस, शाळा, हायस्कूल, बँका, दवाखाने, साटवली तलाठी कार्यालय आदी विविध शासकीय, निम शासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी बीएसएनएलचा एकमेव टॉवर असल्याने या गावातील बहुतांश लोकांना मोबाईल सेवेसाठी तो एकमेव आधार आहे .मात्र गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी मोबाईल रेंज गायब झाल्याने मोबाईल केवळ शोभेची बाहुली बनला आहे. रेंज गायब झाल्याने ग्रामस्थांच्या कामांचा देखील खोळंबा होत आहे .
दरम्यान, संबंधित टॉवर लवकरात लवकर कार्यान्वित करून लोकांची मोबाईल अभावी होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी साटवली येथील अकबर रखांगी यांनी केली आहे.









