२० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी : सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडून विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार म्हणून एकरकमी दहा हजार व पंचवीस हजार प्रदान केले जाणार आहेत. पात्र माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांनी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (०२३५२-२२२२७१) यावर संपर्क साधुन आपले शंका निरसन करावे.
या पुरस्काराकरिता राष्ट्रीय/राज्यस्तरीय खेळातील प्रमाणपत्र धारक, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला क्षेत्रात राष्ट्रीय/राज्यस्तरीय पुरस्कार धारक, पूर, जळीत, दरोडा, अपघात, नैसर्गिक आपत्ती भूकंप/वादळ मध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, यशस्वी उद्योजकांना पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आय.आय.टी, आय.आय.एम, ए.आय.आय. एम. एस. अशा नामवंत ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळवणाऱ्या तसेच इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवूण उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिकांचे पाल्य यांनी प्रस्ताव सादर करावेत.











