सीए अर्पित काब्रा; सप्तर्षी अंतर्गत विविध उपक्रम
रत्नागिरी : भारतीय रूपया चलनात येण्यापूर्वी व्यवहार पद्धतींची माहिती देणारे अकाउंटिंग म्युझियम कॉलेजमध्ये करण्यात येणार आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये अकाउंटिंग म्युझियम सुरू करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी रीडिंग रूमही असेल. सीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यास करण्यासाठी ही रीडिंग रूम अत्यंत महत्त्वाची आहे. मन एकाग्र करून आणि वाचन, अभ्यास करताना कोणतीही अडचण येता कामा नये अशी विद्यार्थ्यांना रीडिंग रूम बनवून देण्यात येणार आहे, अशी माहिती सीए इन्स्टिट्यूटचे पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष सीए अर्पित काब्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विविध कार्यक्रमांसाठी सीए अर्पित काब्रा रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी सीए इन्स्टिट्यूट पश्चिम विभागीय समितीचे कोषाध्यक्ष सीए केतन सैया आणि सचिव सीए सौरभ अजमेरा, रत्नागिरी शाखाध्यक्ष सीए मुकुंद मराठे, उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, सचिव सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी, विकासा अध्यक्ष सीए केदार करंबेळकर, सदस्य सीए प्रसाद आचरेकर उपस्थित होते.
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांकरिता ट्रेन अँड लर्न हा नवीन कोर्स सुरू करण्यात येत आहे. यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न, टीडीएस, जीएसटी रिटर्न्स, जीएसटी रजिस्ट्रेशन, टॅली, ड्राफ्टींग ऑफ लेटर्स अशा प्रकारचा अभ्यासक्रमाचा समावेश आहे. जिल्ह्यातील काही महाविद्यालयात सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने संपर्क साधण्यात येत आहे. त्या त्या ठिकाणी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती असे सीए काब्रा यांनी दिली.
सीए काब्रा यांनी सांगितले की, बारा दिवसात दररोज तीन तास याप्रमाणे हा कोर्स ३६ तासांचा आहे. रत्नागिरीतील सीएच्या विद्यार्थ्यांना वरील कोर्समुळे भरपूर कौशल्य आत्मसात करता येतील. या कोर्सकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेशी संपर्क साधावा. प्रत्येक महाविद्यालयाशी संपर्क साधून अशा स्वरूपाचे वाचनकक्ष खास सीए शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. याद्वारे सीएचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्यवस्थित करता येईल. भारतीय संसदेद्वारा गठित करण्यात आलेल्या सीए इन्स्टिट्यूटद्वारे यंदा सप्तर्षी प्रकल्पाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.