बांदा (प्रतिनिधी) : कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून आणि पंत वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या सहकार्याने सुलोचना प्रकल्पांतर्गत ११ गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा हजाराहून अधिक रुग्ण दरवर्षी मोतीबिंदू मुळे प्रभावित होतात. आरोग्याच्या सुविधा जवळ उपलब्ध नसणे किंवा अनेक वेळा कुटुंब आणि नातेवाईक आर्थिक परिस्थितीमुळे पुढाकार न घेणे तसेच खेडोपाड्यातील अनेक रुग्ण आपल्या परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया करून घेण्यास असमर्थ असतात. अशा गरीब आणि गरजू रुग्णांची तपासणी करून ज्यांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची गरज ओळखून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करून देण्यासाठी कोकण संस्था पुढाकार घेते. येत्या काही महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२०० गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन दृष्टी प्रदान करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी सांगितले.
मोतीबिंदू हे दृष्टिदोषाचे प्रमुख कारण आहे. ज्यामुळे धूसर दृष्टी, रंगांच्या तीव्रतेत बदल, आणि दृष्टीच्या केंद्रात धुके येणे यांसारखी लक्षणे दिसतात. हे वृद्धावस्था, जखमा, मधुमेह, आणि काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे होऊ शकते. म्हणूनच मोतीबिंदूचे लवकर निदान आणि त्यावर त्वरित उपचार होणे आवश्यक आहे.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने गावोगावी नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करते. गरजू रुग्णांना मोफत आवश्यक ते उपचार पुरवण्याचा प्रयत्न करते. कोकण संस्थेच्या या उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि स्थानिक आरोग्य यंत्रणा यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील एकही रुग्ण मोतीबिंदूमुळे अंधारमय जीवन जगणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी सांगितले.
आपल्या गावातील गरजू रुग्ण सापडल्यास कोकण संस्थेशी ( ९०२२१७९५२५) संपर्क साधावा आणि त्यांना एक नवी दृष्टी देण्यास मदत करावे असे आवाहन दयानंद कुबल यांनी यावेळी केले.












