गावोगावी सुरू असलेल्या खैर तोड आणि विक्रीला वरदस्त कुणाचा? 

 

 

ग्रामीण भागात खैर चोरीचे प्रमाण वाढले

चिपळूण ( वार्ताहर) : ग्रामीण भागात गावोगावी जंगलतोड सुरूच आहे. मात्र आता या जंगलतोडी बरोबरच जंगलातील खैर तोड मोठ्या प्रमाणात होत असून त्यांची विक्री सुद्धा राजरोसपणे काटा लावून केली जात आहे. या सर्वाला वरदस्त कोणाचा? असा सवाल आता उभा पुढे येत आहे.

एकीकडे परवानगीशिवाय कोणते झाड तोडू नये, असा फतवा निघाला असून दुसरीकडे बिनधास्तपणे तोड आणि विक्री होत आहे . वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा आता सवाल पुढे येत आहे.

 

तालुक्यातील गावोगावी आता खैर तोडीचे प्रमाण वाढलेले आहे. अनेकजण खैर विक्रीचा व्यवसाय सुरू करून खैराचे लाकूड काट्यावर विकत घेतात. स्वतःचे खैर विकले तर त्या मालकाला चांगले पैसे मिळतात. म्हणून स्वतःच्या मालकी जागेतील खैर विक्री कमी मात्र दुसऱ्याच्या जमिनीतील खैर तोडून विकण्याचे प्रमाण सुद्धा सध्या राजरोसपणे सुरू आहे. प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये काही खैर विक्रीचे काटे सुद्धा लावण्यात आलेले आहेत.

या यामध्ये दिवसाला कितीतरी टन लाकूड त्या ठिकाणी काट्यावरती घातले जाते. मात्र स्वतःच्या जमिनीमध्ये एवढे खैर नसताना एखाद्या व्यक्ती एवढी खैर लाकूड कुठून आणतो हा साधा प्रश्न सुद्धा लाकूड विकत घेणाऱ्या व्यक्तीला पडत नाही. खैर विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांना परवानगी कोण देतो. त्यामुळे आता जंगलात जाऊन खैर विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. या सर्व प्रकाराला नेमका कुणाचा वरदस्त लाभलेला आहे हा एक संशोधनाचा विषय ठरत आहे. जंगल तोड बंद व्हायला पाहिजे. झाडे लावा झाडे जगवा असा प्रयत्न शासनामार्फत सुरू असताना सुद्धा खैर तोड आणि विक्री सुरूच आहे. याकडे वनविभाग सुद्धा लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे. कदाचित जाणीवपूर्वक या गोष्टींकडे वनविभाग लक्ष देत नसावे असेही बोलले जात आहे. खैर विक्री वरती निर्बंध येतील का? कातभट्टीसाठी मोठ्या प्रमाणात खैराचा वापर केला जातो. त्यामुळे गावागावातून स्वतच्या जागेतील कमी पण दुसऱ्याच्या जागेतील चोरी करून खैर तोडण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वनविभाग यांनी लक्ष देण्याची गरज आहे.