जि. प. तळवली नं.१ ची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

 

 

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी इमारतीत जाण्यापासून वंचित; पालकांमधून संताप

 *गुहागर l प्रतिनिधी : गेली अनेक वर्ष मोडकळीस आलेली जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा तळवली नं.१ इमारतीला पालकमंत्री यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. त्यानंतर एक वर्षभर या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. दरम्यान दोन तीन महिन्यांपूर्वी शाळेची इमारत पूर्ण झाली असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले. तर उद्घाटना अभावी या इमारतीमध्ये विद्यार्थी बसविण्यात येत नसल्याचे बोलले जात असून ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते . मात्र इमारत पाहिली असता सदर इमारतीचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून या इमारती समोरच व सभोवार सर्व साहित्यही अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत आहे. ठेकेदाराला सांगूनही दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदाराच्या या हलगर्जीपणामुळे येथील विद्यार्थी या शाळेच्या इमारतीत जाण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे या ठेकेदाराविषयी येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या शाळेची इमारत मोडकळीस आलेली असल्याने गेले दोन वर्षापासून तळवली मोठी बौद्धवाडी येथील समाज मंदिरामध्ये ही शाळा भरवली जात आहे. येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन संजय पवार व ग्रामस्थ राकेश सुखदेव पवार यांनी विशेष प्रयत्नाने पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना शाळा बांधकामे सन 2022- 23 मधून जवळपास 17 लाखाचा निधी मंजूर करून आणला. त्यानंतर या शाळेचा ठेका मे. नवलाई मजूर सहकारी संस्था मर्यादित खोडदे, ता.गुहागर या मजूर संस्थेला मिळाला. या संस्थेने ठेका मिळवण्यासाठी हे टेंडर शेकडा 1.51% कमी दराने भरून रुपये 13 लाख 51 हजार 581 इतक्या रकमेला हा ठेका मिळवला. ठेका मिळाल्यानंतर या संस्थेने एका व्यक्तीला हा ठेका देऊन काम करण्यास सांगितले. दरम्यान या मजूर संस्थेतील एकही पदाधिकारी अथवा संचालक येथील शाळा व्यवस्थापन समितीला भेटण्यासाठी अथवा कामाची पाहणी करण्यासाठी आले नाहीत. म्हणजे फक्त ठेका मिळवून कमिशन घ्यायचं आणि कुणाला तरी काम द्यायचं यासाठीच या संस्था असतील तर अशा संस्थेचे लायसन्स रद्द करण्यात यावे व या कामाची चौकशी व्हावी अशी येथील पालकांची मागणी असून या मजूर संस्थेच्या विरोधात लवकरच जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे बोलले जात आहे.

*येथे काम करण्यासाठी आलेल्या ठेकेदाराने सुरुवातीपासूनच निष्काळजीपणे व मनमानी पद्धतीने काम सुरू केले होते. यामध्ये शासनाचेही खूप नुकसान झाले असल्याचे दिसून येते. याविषयी काही ग्रामस्थांनी विचारणा केली असता या ठेकेदाराकडून निधी कमी असल्याचे सांगण्यात आले. सदर काम काही दिवस येथील ग्रामस्थांनी थांबवले. त्यानंतर शाळेचे काम थांबू नये व येथील मुलांची गैरसोय लक्षात घेऊन पुन्हा योग्य पद्धतीने काम करण्यास सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही या ठेकेदाराने हलगर्जीपणा करून हे काम केलेले दिसून येते. इमारतीला रंगरंगोटी करून हा ठेकेदार दोन-तीन महिने तिकडे फिरकतच नसल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. इमारती समोर तसेच सभोवार सर्व साहित्य अस्ताव्यस्त स्वरूपात पडलेले दिसून येत आहे. येथे आहे त्या परिस्थितीमध्ये मुलांना शाळेत पाठवणे खूप अडचणीचे ठरले आहे. यामुळे येथील विद्यार्थी अद्याप या शाळेच्या इमारतीत बसण्यापासून वंचित आहेत. याला जबाबदार निव्वळ ठेका घेणारी मजूर संस्था आहे. त्यामुळे या मजूर संस्थेचे लायसन्स रद्द करण्यात यावे व कारवाई व्हावी अशी मागणी येथील ग्रामस्थ, पालक करत असून लवकरच याविषयीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.*