गुहागर-विजापूर मार्गावरील वाशिष्ठी पुलावर भीषण अपघात

टँकर चालकाचा जागीच मृत्यू

चिपळूण: गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH 66) वाशिष्ठी नदीवरील पुलाजवळ असलेल्या कॅनलजवळ रविवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा एक गंभीर अपघात घडला आहे. चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा एक टँकर अनियंत्रित होऊन पलटी झाला, या दुर्घटनेत टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर टँकर (एमएच-16AE 6100) हा चिपळूणच्या दिशेने येत असताना कॅनलजवळ टँकरवरील नियंत्रण सुटले. चालकाने टँकरमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला; मात्र टँकर त्याच ठिकाणी जोरदार पलटी झाल्यामुळे तो टँकरखाली दबला गेला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका भीषण कार अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा याच ठिकाणी मोठा अपघात झाल्याने मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. टँकर काढण्याचे आणि मृताची ओळख पटवण्याचे कार्य पोलीस करत आहेत.

पुलाजवळ सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे या मार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.