चिपळूण आबीटगाव येथील अनन्या खेराडे हीचा छोटे उस्ताद ३ च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश

 

चिपळूण तालुक्यातून होतोय कौतुकाचा वर्षाव

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील आबीटगाव येथील कुमारी अनन्या विजय खराडे ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार ३ (छोटे उस्ताद) या कार्यक्रमांमध्ये तिची निवड झाल्यानंतर आतापर्यंतचा प्रवास अतिशय कौतुकास्पद आहे. नुकतीच तिने आपल्या सुमधुर गायनाने या कार्यक्रमात सेमी फायनल मध्ये धडक मारली आहे. त्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे .

तालुक्यातील ग्रामीण भागातील आबिटगाव खालचीवाडी येथील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शेतकऱ्याच्या मुलीने संगीत क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये आतापर्यंत केलेली कामगिरी खरोखरच अभिमानास्पद आहे. अनन्या खेराडे हिने मी होणार सुपरस्टार ३ छोटे उस्ताद या कार्यक्रमामध्ये एकापेक्षा एक गाणी गात परीक्षक असलेले सचिन पिळगावकर , वैशाली सामंत व आदर्श शिंदे यांची कौतुकाची थाप तिने मिळवली आहे.

 

 

नुकताच शनिवारी झालेल्या या कार्यक्रमांमध्ये लावणी गात आणि सवाल जवाब गाताना अनन्या खेराडे ही उजवी ठरली आणि परीक्षक आदर्श शिंदे यांनी ही सेमी फायनल मध्ये जाणारी पाचवी स्पर्धक आहे असे जाहीर केले. यावेळी अनन्या खेराडे हिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. तिच्या सर्व चाहता वर्गाला सुद्धा आनंद झाला.
जिल्हा परिषद आबीटगाव शाळेच्या इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अनन्या हिला लहानपणापासूनच गायन व नृत्य कलेची आवड आहे. सावर्डे येथील शारदा संगीत साहित्य कला क्रीडा अकादमीच्या संगीत विद्यालयात गुरुवर्य वरद केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. हे मार्गदर्शन तिला खरोखरच यशाच्या वाटचालीकडे नेत आहे. मी होणार सुपरस्टार ३ छोटे उस्ताद कार्यक्रमात तिने आपल्या उत्तम गायनाने महाराष्ट्रातील सर्वांची मने जिंकली आहेत. ती सेमीफायनल मध्ये पोचली असून अनन्या खेराडे हिला अंतिम फेरीतील स्पर्धकांमध्ये समाविष्ट झालेले आणि विजयी झालेले सर्वांनाच पाहायचा आहे.
खास चिपळूण तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.