सफाई कर्मचारी बनला स्वच्छता निरीक्षक

खेडमधील सुजीत जाधव यांना आयुक्तांच्या आदेशाने पदोन्नती

चिपळूण (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषदेत गेली चार वर्षे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले सुजित अशोक जाधव यांची मा. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय, मुंबई यांच्या आदेशाने चिपळूण नगरपरिषद येथे स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानुसार ते गुरुवारपासून कामावर रुजू झाले आहेत.

सुजित जाधव हे सुशिक्षित व अभ्यासू, निर्भीड व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी एम.कॉम, एम.बी.ए. (मार्केटिंग), एल.एल.बी, एस. आय (सॅनिटरी इन्स्पेक्टर), एल.एस.जी.डी, व जी.डी.सी.ए. (सहकार शासकीय पदविका) शिक्षण घेतले आहे. तसेच ते आता एल.एल.एम. देखील करत आहेत. वडील अशोक जाधव यांनीदेखील खेड नगर परिषदमध्ये सफाई कामगार या पदावर गेली ३७ वर्षे सेवा दिल्यानंतर त्यांच्या पश्चात सुजित जाधव यांची सफाई कर्मचारी या पदावर नेमणूक झाली होती.

सुजित जाधव हे सफाई कर्मचारी हजर झाल्यानंतर शहरातील दैनंदिन साफ सफाईचे कामकाज करत; परंतु पुढील तीन महिन्यांतच कोरोना सारख्या विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले होते त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी सुजित जाधव यांचे शिक्षण आणि कामाची पद्धत बघून त्याच्यावर संपूर्ण खेड शहराची कोव्हिड कंट्रोल अधिकारी म्हणून आदेश देऊन जबाबदारी निश्चित केली. त्या जबाबदारीला सुजित जाधव यांनी योग्य न्याय दिला. याच सेवेचा विचार करुन खासदार सुनील तटकरे तसेच तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते सुजित जाधव यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान प्रदान करण्यात आला होता. या नियुक्तीबद्दल त्यांचे खेड शहरात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

चौकट-
कोव्हिड काळात १२०० रुग्णांची सेवा
कोरोना काळात शहरातील कोव्हिडबाधित रुग्णांची दैनंदिन माहिती संकलित करून वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पुढील उपचारसाठी पाठवत असत तसेच पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कार्यवाही करत त्यांनी कोरोना काळात साधारण १२०० रुग्णांना सेवा दिली होती.