जर यातील काही वैभव नाईकने घडवले असेल तर पाकिस्तानला जायची तयारी करायची
भाजपा नेते निलेश राणे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
मालवण | प्रतिनिधी : राजकोट येथे ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा आ. वैभव नाईक पंधराव्या मिनिटाला पोहचला कसा? असा सवाल उपस्थित करत भाजपा नेते निलेश राणे म्हणाले, माझ्या कानावर जी माहिती आली ती धक्कादायक आहे. देव करो आणि हे खोटं निघावे. अन्यथा वैभव नाईक आणि कुटुंब महाराष्ट्रात राहू शकणार नाही. या निलेश राणे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपा नेते निलेश राणे म्हणाले, वैभव नाईकचे घर मालवण पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. असे असताना 15 व्या मिनिटाला मालवणात घटनास्थळी कसा पोहचू शकतो? जर का यातील काही वैभव नाईक याने घडवले असेल तर आताच पाकिस्तानला जायची तयारी करायची. अश्या औलादी महाराष्ट्रात आहेत का? राजकारण कुठल्या दिशेला जात आहे? असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
या बाबत निलेश राणे म्हणाले, सध्या तरी माझ्या कानावर जी माहिती आली ती 50 टक्के आहे. वैभव नाईकचा माणूस फुटला आहे. सर्व माहिती खात्रीशीर मिळवण्याचा प्रयत्न आहे. ती मिळाली तर सांगेनच मात्र देव करो आणि हे खोटं निघावे असेही निलेश राणे म्हणाले आहेत.











