चेतन पाटील याला पोलिसांनी केली अटक 

राजकोट येथील शिवारायांचा पुतळा कोसळल्याची घटना : दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांकडून सुरु आहे तपास

मालवण | प्रतिनिधी : किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी कामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष वधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक व अन्य गंभीर कलमां अतर्गत मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला पोलिसांनी कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. मालवण पोलीस ठाण्यात त्याला आणल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.

 

याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 अजित जनकराज पाटील यांनी दिली आहे. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे प्रशासनाला आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करत मालवण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

 

सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, छत्रपती शिवाजी महाराज हे भारत देशाचे राष्ट्र पुरुष आहेत. राजकोट येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षितता लक्षात घेवून हा पुतळा शतकानुशतके सुस्थितीत सुरक्षित व दिमाखाने उभा राहण्याच्या दृष्टीने परिपूर्ण व त्या संदर्भात आवश्यक अशी सर्वोतोपरी काळजी घेणे आवश्यक होते. परंतु पुतळा बनविणारे शिल्पकार व बांधकाम सल्लागार यांनी हा पुतळा कोसळला तर पुतळ्याच्या जवळील पर्यटक व इतर लोकांचे मृत्यू होईल तसेच अपरिमित जीवित व वित्त हानी होतील याची पूर्ण जाणीव असतानाही पुतळ्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष केले.

 

या पुतळ्याच्या उभारणीचा अभ्यास न करता पुतळ्याची निकृष्ट दर्जाने उभारणी केली. तरी जयदीप आपटे व डॉ. चेतन पाटील यांनी एकमेकांच्या संगनमताने हे कृत्य केले. त्यांच्या वर मालवण पोलिसात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११०, १२५, ३१८, ३(५), ३ अन्वये तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

पोलिसांकडून संशयित आरोपिंचा शोध सुरु होता. या दरम्यान कोल्हापूर पोलिसांसमोर चेतन पाटील हजर झाला. कोल्हापूर एसपी यांनी सिंधुदुर्ग एसपी यांना माहिती दिली. या दरम्यान सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक कोल्हापूर येथे तपास कामी असताना त्यांनी चेतन पाटील याला ताब्यात घेतले. मालवण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर चौकशी अंती शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता चेतन यास अटक करण्यात आली. शनिवारी त्याला न्यायलयात हजर केले जाणार आहे. तर गुन्ह्यातील शिल्पकार जयदीप आपटे यांचाही शोध सुरु असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.