लांजा (प्रतिनिधी) कल्पना कॉलेज लांजा च्यावतीने
महिला अत्याचार आणि संरक्षण या विषया
वरील रांगोळी स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत तालुकास्तरीय खुल्या गटात विनेश पांचाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कल्पना कॉलेजच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिला अत्याचार आणि संरक्षण हा विषय स्पर्धकांना देण्यात आला होता.सध्या देशात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरिय खुला गट व कल्पना कॉलेज गट अश्या दोन गटात घेतलेल्या या स्पर्धेत अनेक एकूण १७ स्पर्धकांनी भाग घेतला.

सर्व स्पर्धकांनी आपले कौशल्याचं प्रदर्शन करत विषयाला दाद देणाऱ्या अतिशय बोलक्या रांगोळ्या काढल्या. बलात्कार, ऍसिड अटॅक, स्त्री भ्रूण हत्या, कौटुंबिक हिंसा, लैंगिक आणि मानसिक शोषण यांसारख्या अनेक ज्वलंत विषयांवर रांगोळ्या काढून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा उद्देश पूर्ण केला.
या स्पर्धेचे परीक्षण माजी कलाशिक्षक आणि उत्कृष्ट चित्रकार किरण बेर्डे, डी. जे. सामंत स्कुल चे कलाशिक्षक श्रीतेज पांचाळ, ज्युनिअर कॉलेज लांजा चे प्राध्यापक आणि मोडीलिपी या दिवाळी अंकाचे सह संपादक विजय हटकर यांनी केले.
तालुकास्तरीय खुल्या गटात विनेश अशोक पांचाळ यांनी प्रथम आणि कु. अनुष्का रमेश गोसावी हिने द्वितीय क्रमांक पटकावले. कल्पना कॉलेज सामूहिक गटात कु. श्रावणी जयसिंग बांदकर व कु. करीना हरिश्चंद्र मनचेकर यांनी प्रथम, कु. मिनल राजपूत व कु. अपेक्षा दिपक लिंगायत यांनी द्वितीय आणि कु. तेजल कुंभार आणि कु. कुंभार यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी मंचावर कल्पना असोसिएशनचेचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, प्राचार्य विकी पवार, प्रा. प्रीतम तेंडुलकर उपस्थित होते. तसेच संपुर्ण स्पर्धेचे नियोजन कामिनी आयरे आणि अब्जा वणू यांनी पाहिले.












