स्वयंपूर्ण कोकण हे मिशन घेऊन काम करायला हवे: डॉ. प्रमोद सावंत

 

चिपळूणमध्ये अपरांत भूषण पुरस्कार वितरण सोहोळा

चिपळूण (प्रतिनिधी): कोकणने भारताला अनेक प्रतिभावंत माणसं दिली आहेत. चिपळूणमध्ये आल्यानंतर लोकमान्य टिळक वाचन मंदिराचे कलादालन पाहिल्यानंतर आपल्याला माहीत नसलेल्या कोकणातील प्रतिभावंत माणसांची ओळख झाली. या कलादालनात लोकमान्य टिळकांपासून ते नारायण राणे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. याच प्रमाणे वाचनालयाच्या कलादालनात डॉ. श्रीधर ठाकूर यांचे तैलचित्र लावावे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुचविताना स्वयंपूर्ण कोकण हे मिशन राबवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्र यांनी आयोजित केलेल्या अपरान्त भूषण पुरस्कार सोहोळा शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात झाला. अपरांत भूषण पुरस्कार डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते इन्फिगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना शुक्रवारी सायंकाळी प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, संस्कृती जपताना पर्यटन विकास, उद्योग वाढवून कोकणाला आणि देशाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी डॉ. श्रीधर ठाकूरांसारख्या लोकांनी पुढाकार घ्यावा. चिपळूणातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे काम प्रेरणादायी आहे.

यावेळी डॉ. श्रीधर ठाकूर म्हणाले, आई-वडील, पत्नी, कुटुंबीय, मित्र परिवार, सहकारी डॉक्टर, इन्फीगोचे सर्व कर्मचारी हे माझ्या आयुष्यात दहीहंडीच्या खालील सर्व थरांप्रमाणे आहेत. त्यांच्यामुळे मी या यशाच्या शेवटच्या थरावर पोहोचलो आहे.

कार्यक्रमाला लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, भाजपचे बाबा परुळेकर, डॉ. श्रृती ठाकूर, चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आ. डॉ. विनय नातू, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, साहित्यिक प्रकाश देशपांडे, उद्योजक डॉ प्रशांत पटवर्धन, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, माजी सभापती रामदास राणे, माजी नगरसेवक आशिष खातू, विजय चितळे, रसिका देवळेकर, सुनील कुलकर्णी, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, राष्ट्रपाल सावंत, अरुण इंगवले, राजेश जोष्टे, अभय चितळे, सुनील जांभेकर, नित्यानंद भागवत, महेश दीक्षित, इमरान कोंडकरी, अमोल भोबस्कर, विनायक ओक, अविनाश पोंक्षे, मधुसूदन केतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी वाचनालयाची माहिती दिली. डॉक्टर ठाकूर यांचा परिचय संचालिका मनीषा दामले यांनी करून दिला. मानपत्र वाचन अंजली बर्वे यांनी केले, तर सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले.