महाविकास आघाडी ‘पुतना मावशी’

 

जोरदार घोषणाबाजी करत भाजपाचे मालवणात निषेध आंदोलन

मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याचे राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडी नेत्यां विरोधात मालवणात भाजपा पदाधिकारी यांनी निषेध आंदोलन छेडले. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

महाविकास आघाडीचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल दाखवत असलेले प्रेम हे पुतना मावशीचे प्रेम आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी हा सर्व आव आणला जात आहे. अशी टीका भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली.

दरम्यान, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी नंतर आठ महिन्यात त्या ठिकाणी आले नाही ते महाविकास आघाडीचे नेते आता केवळ राजकारण करण्यासाठी येत आहेत. असे सांगत मोंडकर यांनी सर्वांचा निषेध नोंदवाला.

मालवण भाजपा कार्यालय परिसरात भाजपा पदाधिकारी यांनी एकवटत जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीचे पितळ उघडे पाडत त्यांच्या नेतेमंडळींचा समाचार घेतला.

छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत. त्यांच्या नावाने राजकारण होता नये. पुतळा कोसळला याबाबत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही माफी मागितली. असे असताना महाविकास आघाडीकडून राजकारण सुरु आहे.

जेव्हा विशाळगडावर अतिक्रमण झाले होते तेव्हा महाविकास आघाडीची ही मंडळी कुठे होती. फक्त सोईचे व मतांचे राजकारण सुरु आहे. अशी टीका चिंदरकर यांनी केली.

तटबंदी ढकलून घातली

राजकोट किल्ला येथे महाविकास आघाडीनी धुडघूस घालत तटबंदीचे दगड कोसळवले. याचे फोटो, व्हिडिओ आहेत. तरी पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी. अशीही मागणी धोंडी चिंदरकर यांनी केली आहे.

वैभव नाईकांची पोलिसांनी चौकशी करावी

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यावेळी तेथे 15 मिनिटात पोहचणाऱ्या आ. वैभव नाईक यांची चौकशी व्हावी. अशी संतप्त मागणी धोंडी चिंदरकर यांनी केली केली आहे.