पाळीव जनावरांवरील हल्ल्यामुळे ग्रामस्थ हैराण
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील साटवली गावामध्ये सद्यस्थितीत भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.या भटक्या कुत्र्यांमुळे शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना देखील धोका निर्माण झाला असून येथील शेतकरी चांदमियॉं बरमारे यांची बकरी देखील या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे .
तालुक्याच्या पश्चिम भागातील साटवली भागात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांचा विशेष त्रास हा येथे शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना होत आहे. विशेषतः शेळ्या मेंढ्या, गाई गुरे अशा पाळीव जनावरांच्या अंगावर ही भटकी कुत्री धावत जात असून प्रसंगी या या पाळीव जनावरांवर हल्ले करण्याचे प्रकार देखील त्यांच्याकडून सुरू आहेत. आठ ते दहा अशा झुंडीने व टोळीने ही भटकी कुत्री फिरत असून त्यामुळे पाळीव जनावरांबरोबर येथील स्थानिक ग्रामस्थांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे .
नुकतेच या भटक्या कुत्र्यांनी येथील शेतकरी चांदमियॉं बरमारे यांच्या बकरीवर हल्ला करून तीला ठार केले होते. या घटनेत बरमारे यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे .त्यामुळे या झुंडीने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा अधिकच वाढला असून त्यामुळे शेतकरी वर्ग आणि त्याच्या पाळीव जनावरांना धोका संभवतो आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांबाबत वेळीच उपाययोजना करण्याची मागणी आता शेतकरी वर्गातून केली जात आहे.











