इन्सुलीत एक्साईजने ३३ लाखांची दारू पकडली

 

 

बांदा : प्रवीण परब :    गोव्यातून मुंबईकडे केला जाणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने आज पहाटे कारवाई केली. या कारवाईत ३३ लाख ६६ हजार रुपयांची दारू, १७ लाख रुपयांचा कंटेनर व १२ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५० लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी कुंदन (२६, रा. धार, मध्यप्रदेश) व टोनी मोरोईएस (४८, रा. मडगाव गोवा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई आज सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास इन्सुली एक्साईज चेकपोस्ट समोर महामार्गावर करण्यात आली.

 

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, धनंजय साळुंखे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दीपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजीत शिंदे, जगन चव्हाण यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत.