चाकरमानांच्या सुरक्षित प्रवासासाठी संबंधित विभागांना सूचना
संतोष कोत्रे l लांजा -: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली लांजा पोलिसांनी आंजणारी ते वाटुळ या दरम्यान मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.
दिनांक ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी हे गावी दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकीतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची गैरसोय ही चाकरमान्याचे होऊ नये, गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, ट्रॅफिक जाम, अपघात यासारखे प्रकार घडू नयेत या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून लांजा उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व पोलीस कर्मचारी यांनी आंजनारी ते वाटुळ या दरम्यान मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली
यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग, लांजा नगरपंचायत आणि वाहतूक शाखा यांचे कर्मचारी, अधिकारी सहभागी होते. गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या गणेशभक्त, चाकरमानी यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.












