खेडमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा

 खेड(प्रतिनिधी) खेड शहरात ऐन पावसाळ्यातही पाण्याचा टँकर धावत आहे. कमी दाबाच्या पाणी समस्येसह बऱ्याचवेळा नळाला पाणीच येत नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवण्याची वेळ नगर प्रशासनावर येवून ठेपली आहे. मात्र नगर प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याने नागरिकांना प्रसंगी विकतच्या पाण्यावरही तहान शमवावी लागत आहे.
शहरातील वाणीपेठ, शिवतररोड, समर्थनगर, दापोलीनाका, ब्राह्मणआळी, महाडनाका परिसरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. कमी दाबाने वितरित होणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांची हेळसांड सुरू आहे.
काही ठिकाणी दिवसातून एकचवेळ पाणी येत असल्याने काटकसर करून पाण्याचा वापर करावा लागत आहे. शिवतररोड परिसरात पाणीप्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. या ठिकाणी नगर प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी ऐन पावसाळ्यात टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील मोजक्याच भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचा सूर ग्रामस्थांकडून आळवला जात आहे. यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. नगर प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही नागरिकांतून होत आहे.