देवगड हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक शेखर इचलकरंजीकर यांचे निधन

देवगड हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक शेखर चंद्रकांत इचलकरंजीकर यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. मृत्यू समयी त्यांचे वय 79 वर्षे होते. नामांकित विधीज्ञ ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांचे ते वडील होत.

देवगड मध्ये त्यांची इचलकरंजीकर सर म्हणून ओळख होती 1972 साली त्यांनी देवगडमध्ये मोंड हायस्कूल मधून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. देवगड हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून सेवा केली तर वाडा हायस्कूल मधून 2004 साली ते निवृत्त झाले.

1978 साली झालेल्या राज्यव्यापी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचे त्यांनी नेतृत्व केले होते. शिवचरित्राचा प्रचार व प्रसार करण्याचा उपक्रम त्यांनी प्राधान्यक्रमाने केला. शिवचरित्रावरील पुस्तके मुलांना देऊन त्यावर परीक्षा घेऊन बक्षीस देणे,या उपक्रमामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. देवगड जामसांडे गावाची ग्रामदेवता दिर्बादेवी वज्रलेप समितीवर त्यांनी पदाधिकारी म्हणून स्थान भूषविले होते.

सनातन संस्थेत ते बऱ्याच काळ कार्यरत होते. माणसाचे स्वभाव दूर करून त्याला अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग यावर ते मार्गदर्शन करत. ज्ञानेश्वरीची पारायण करण्याचे अनेक उपक्रम त्यांनी देवगड मध्ये आयोजित केले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा एडवोकेट वीरेंद्र व दोन मुली आहेत.