ॲड. विलास पाटणे यांच्या प्रतिभा आणि प्रतिमा पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते होणार

 

 

रत्नागिरी : येथील वकिल, साहित्यिक, रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे लिखित प्रतिभा आणि प्रतिमा या पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने न्यायमूर्ती ओक यांच्यासह उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, ज्येष्ठ विधीज्ञ रत्नागिरीत येणार आहेत. येत्या शनिवारी (ता. १४) सकाळी १०.३० वाजता माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.

 

अॅड. विलास पाटणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली. या वेळी अॅड. नेने, अॅड. फणसेकर उपस्थित होते. अॅड. पाटणे यांनी यापूर्वी राणी लक्ष्मीबाई, न्या. रामशास्त्री, अक्षर प्रकाश, सापडलेलं आकाश, संचित, अपरांत, आदी पुस्तके लिहिली आहेत. अॅड. पाटणे यांचे हे आठवे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये न्यायाधीश, विधीज्ञ वकिल यांच्या आदर्शवत चरित्राविषयी लिखाण केले आहे.

 

या कार्यक्रमाकरिता न्यायमूर्ती अभय ओक रत्नागिरीत येणार असल्याने न्यायालयीन वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, रत्नागिरीचे पालक न्यायाधीश माधव जामदार, इंग्रजी साहित्याच्या अभ्यासक न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई (नि.) हे मुंबई उच्च न्यायालयातील तीन ज्येष्ठ न्यायाधिश, उच्च न्यायालयातील ज्येष्ठ व प्रसिद्ध ॲड. अभय खांडेपारकर, रत्नागिरी जिल्हा प्रधान न्यायाधीश सुनिल गोसावी उपस्थित राहणार आहेत.

 

प्रकाशन सोहळ्याला कोकणातील विधी महाविद्यालयांतील विद्यार्थी, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळी कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी कृती समितीचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत यांच्या नेतृत्वाखाली सहा जिल्ह्यांतील वकिलांचे शिष्टमंडळाल न्या. ओक यांना भेटून निवेदन देणार आहेत. तत्पूर्वी न्या. अभय ओक हे रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील भारतरत्न नोबेले विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या म्युरल स्मारकाला भेट देणार आहेत.

 

भाषणाची पर्वणी

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक यांचे भाषण ही विद्यार्थ्यांना एक आगळीवेगळी पर्वणी आहे. ते म्हणतात, न्यायदान करताना केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही तर त्याच्या जोडीला धैर्य असणे गरजेचे आहे. जे रामशास्त्रींनी त्या काळात दाखवले होते, त्याला तोड नाही. न्यायव्यवस्थेतील रामशास्त्री हे आमच्यासमोर सर्वोच्च आदर्श आहेत.