बामणोली येथे सेवानिवृत्त सोहळ्यात केले प्रतिपादन
ग्रामस्थांनी मिरवणूक काढत केले सैनिक मनोज तांबे यांचे स्वागत
संतोष कुळे l चिपळूण :आपल्याला लहानपणापासून देशसेवा करण्याची आणि सैनिक दलाचा गणवेश अंगावर परिधान करण्याची इच्छा होती. अखेर कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हाच गणवेश धारण करीत देशसेवा करण्याचे भाग्य लाभले. यात माझ्या कुटुंबाचे सहकार्य हाच खरा माझा आधार होता. त्यांनीच माझे मनोबल वाढवले असे, मत भारतीय सैनिक मनोज तांबे यांनी सन्मान सोहळ्यात व्यक्त केले.

चिपळूण तालुक्यातील बामनोली पश्चिम तांबेवाडी येथे सैनिक दलातून सेवानिवृत्त झालेले मनोज तांबे यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचारमंचकावर बामनोली सरपंच सुदेश गमरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक वनगे, बळीराज सेना रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश चांदिवडे, सुधीर तांबे, शिवसेना पदाधिकारी प्रभाकर जाधव, योगेश खांडेकर, पत्रकार भाई कुळे, सुरेश चांदिवडे, सुनील डिंगणकर, एकनाथ भुवड, माजी सैनिक श्री, घाग, श्री. पाष्टे, भालचंद्र जोगले, रामचंद्र तांबे, मनोज तांबे यांचे कुटुंबीय व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सेवानिवृत्त सैनिक मनोज तांबे म्हणाले की, आपण जेव्हा इयत्ता दहावी उत्तीर्ण झालो. त्यानंतर चिपळूण येथे डीबीजे महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमासाठी गेलो असता त्या ठिकाणी सैनिकी गणवेशातील काही सैनिक पहिले आणि हाच गणवेश आपल्या अंगावरती असावा त्याच दिवशी मनोमन ठरवले. तोच आपल्या जीवनाचा टर्निंग पॉईंट होता. नंतर त्या दिशेने आपण प्रयत्न करू लागलो. योगायोगाने भरती निघाली. त्यानंतर प्रवेश मिळवला. ज्या दिवशी मला भारतीय सैनिक दलाच्या नोकरीचे पत्र मिळाले तो दिवस माझ्यासाठी अतिशय भाग्याचा होता. 5 ऑगस्ट 2002 मध्ये भारतीय सैन्य दलात सामील झालो. कोल्हापूर या ठिकाणी ट्रेनिंग घेतल्यावर अनेक ठिकाणी पोस्टिंग होत गेली आणि अखेर 31 ऑगस्ट 2024 रोजी २२ वर्षे सेवा करून सेवानिवृत्ती झालो. आज हा सेवानिवृत्त सन्मान सोहळा म्हणजे माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या कुटुंबाने जे मला सहकार्य केले तोच खरा माझा आधार होता. त्यामध्ये माझे चुलते, आई-वडील, माझी पत्नी माझी मुले या सर्वांनीच मला आधार दिला. प्रत्येक सणाला सर्वांचे वडील घरी यायचे. तेव्हा माझी मुले ही मला फोन करून विचारात असत की पप्पा तुम्ही कधी घरी येणार. मात्र, त्यावेळी माझ्याकडे मुलांना सांगण्यासाठी उत्तर नसायचं. कारण देशसेवा हेच माझ्यासाठी माझा अखेरचा श्वास होता. मला वाटायचे आपण देशसेवा करताना कधीतरी या तिरंग्यामध्ये लपेटून येऊ शकतो का? असाही विचार मनात यायचा. पण कधीही कुटुंबाशी बोललो नाही. पण २२ वर्षे जी सेवा केली त्यात आपल्या आई वडिलांची पुण्याई होती म्हणूनच सुखरूप घरी आलो. असे त्यांनी सांगितले.
पुढे निश्चितच आपण गावातील लोकांसाठी त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत राहू. त्याचबरोबर युवकांनी भारतीय सैनिक दलात प्रवेश घेतला पाहिजे. कारण देशसेवे सारखे दुसरे पुण्याचे कामं नाही. असा सल्ला त्यांनी युवकांना दिला.
सन्मान सोहळ्या आधी सकाळी बामणोली शाळा ते गवळवाडी स्टॉप अशी भव्य मिरवणूक काढत मनोज तांबे यांचे स्वागत करण्यात आले. या मिरवणूकमध्ये ग्रामस्थ महिला सामील झाल्या होत्या. मनोज तांबे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. साईसेवा बाल मित्र मंडळ पश्चिम तांबेवाडी बामणोली यांनी खास सन्मान मनोज तांबे यांचा केला. प्रत्येकाने शुभेच्छा देत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गमरे यांनी केले.











