अजित पवार गटाचे नेते, आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतील कुर्ला भागात मंगळवारी हा अपघात झाला. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर खान कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयात नियमित तपासणीसाठी गेले होते. यावेळी त्यांची कारचालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी (वय – 38) चालवत होता. तपासणी करून बाहेर आल्यावर समीर आणि निलोफर हे दांपत्य गाडीत बसत असताना चालकाकडून अचानक अॅक्सीलेटरवर पाय ठेवला गेला आणि गाडी एचडीआयएल वसाहतीच्या संरक्षण भिंतीजवळ जाऊन आदळली.
गाडीत बसण्याच्या तयारीत असणारे समीर हे देखील गाडी सोबत फरफटत गेले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.












