नवी दिल्ली- लेबनॉन देश मंगळवारी हादरला. अचानक अनेक लोकांच्या पेजर्समध्ये स्फोट झाला. यात नऊ जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, तर अडीच हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
या हल्ल्यामागे इस्त्राईलच्या मोसादचा हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. एका रिपोर्टमध्ये या संदर्भात महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे.
इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसादने तैवान-मेड ५००० पेजर्समध्ये छोट्या प्रमाणात स्फोटकं ठेवली होती. याच स्फोटकांचा मंगळवारी स्फोट झाला असं लेबनॉनच्या सुरक्षा यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
मोसादचा खतरकान प्लॅन
लष्करी संघटना हिजबोल्लाहच्या हजारो दहशतवाद्यांकडून पेजर हे वायरलेस उपकरण मोठ्या प्रमाणात आजही वापरले जाते. लेबनॉन आणि सिरियामध्ये या उपकरणांचा स्फोट झाला. ज्यामुळे आतापर्यंत नऊ लोकांचा जीव गेला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोट होण्याआधी प्रत्येक पेजरवर कोडेड मसेज आला होता. त्यानंतर हा स्फोट झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हिजबोल्लाहने तैवानच्या एका कंपनीकडून पेजर्स मागवले होते. याचा फायदा घेऊन गुप्तहेर संघटना मोसादने या पेजर्समध्ये कोड रिसिव्ह करणारे स्फोटकं लपवली होती. कोणत्याही डिव्हाईस किंवा स्कॅनरमध्ये हे स्फोटकं डिटेक्ट होऊ शकले नाहीत.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, तैवानच्या गोल्ड अपोलो या कंपनीकडून एप्रिल ते मे महिन्यात ५ हजार पेजर्सची ऑर्डर देण्यात आली होती. स्फोट झालेले काही पेजर्स मिळवण्यात आले आहेत. यावरून याप्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. सध्य स्थितीनुसार, हा मोसादचा नियोजित कट होता असं दिसतंय.
स्काय न्यूजच्या सूत्रांनुसार, इस्त्राईलच्या मोसादने PETN नावाचे स्फोटक पेजर्समध्ये ठेवले होते. तापमान वाढवून या मटेरियलमध्ये स्फोट घडवून आणता येतो. जवळपास २० ग्रॅमचे स्फोटक मटेरियल ठेवण्यात आले होते. स्फोटकं कशी सक्रीय झाली याबाबत तपास सुरु झाला आहे. इस्राईलने यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही.











