गेल्याकाही वर्षातील आपल्या देशातील राजकारण आणि राजकिय स्थित्यंतरे पाहिली की आपणालाच नव्हेतर अखंड देशाला पहिली आठवण जर कोणाची होत असेल तर ती संसदपटू बॅ.नाथ पै यांचीच होते. नि:स्वार्थीभाव जपत संसदेच्या लोकसभागृहात १९५७ ते १९७१ अशी तब्बल १४ वर्षे देशाच सभागृह आपल्या अभ्यासू अमोघ वक्तव्यानी गाजवणाऱ्या बॅ.नाथ पै यांच्या विचारांनी सभागृह भारलेले असायच.

देशात काँग्रेसची सत्ता त्यात बॅ.नाथ पै यांच्यासारखा विरोधी विचारांचा सदस्य परंतु दस्तुर खुद्द देशाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू देखील बॅ.नाथ पै यांच सभागृहातील भाषण, विचार एैकायला आवर्जुन येऊन बसत असत. जस लोकसभागृहात एक वेगळ स्थान आणि मान जसा बॅ.नाथ पै यांना होता. तसच बॅ.नाथ पै यांच्यावर जिवापाड प्रेम करणारा कोकणातील त्यांचा मतदार होता. बॅ.नाथ पै यांच्या विचारांची जादू एवढी प्रचंड होती की कोकणातील जनता नेहमीच बाकी. कोणताही विचार न करता बॅ.नाथ पै यांना निवडून देत राहिली. नाथांप्रती कोकणातील जनतेच्या मनात नितांत आदर आणि विश्वासाची भावना होती. नाथांच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्यांशीही फार वेगळ नातं तयार झालं होतं.
कुणाही शेतकऱ्यांच्या घरी घोंगडीवर बसून चटणी-भाकरीचा आस्वाद घेत जनतेशी असलेली कनेक्टीव्हीटी नाथांनी जपली होती. नाथानी खरंतर कोकणाला ज्ञानाच प्रचंड मोठं भांडार दिलं. विद्धवत्ता आणि साधेपणा कसा जपला जाऊ शकतो हे केवळ नाथांकडून शिकण्यासारख आहे. वेंगुर्ले येथे बॅ.नाथ पै यांच स्मारक उभं झालय. बॅ.नाथ पै समुदाय केंद्र स्थापन झालय. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. चालणं, बोलणं आणि वागणं, आचार-विचार नेहमी सुसंगत असावेत असं म्हटलं जाते. या विचारातील शुद्धता आणि त्याच पद्धतीने आचरण हे तशी सोपी गोष्ट नाही. परंतु बॅ.नाथ पै जस बोलायचे तसच त्यांच वर्तन होत. त्यांचा भाषेवर, विचारांवर, अभ्यासावर आणि स्वत:वर प्रचंड विश्वास होता. यामुळेच बॅ.नाथ पै यांच बोलणं एैकायला संसदेत आणि जनतेतही ओढ असायची. अशा या विचारवंत अभ्यासू व्यक्तिमत्वाच उचित स्मारक बॅ.नाथ पै समुदाय केंद्राच्या रूपाने वेंगुर्लेत उभं आहे.
नाथांच्या विचारांनी भारलेलं कोकण होतं. या नाथांच्या विचारांची प्रचंड पगडा कोकणातील जनतेवर होता. आजही नाथांच्या सहवास लाभलेल्यांना त्यांच्या आठवणीत रमताना, त्यांना व्याकुळ व्हायला होता. अशा पद्धतीची बॅ.नाथ पै आणि जनतेमध्ये कनेक्टीव्हीटी राहिली आहे. नाथांनी कोकणाला काय दिले, असेल तर नाथांनी कोकणाला विचारांचा मोठा वारसा दिला आणि यामुळेच गेल्या साठवर्षानंतरही राजकारण, समाजकारणाच्या आदर्शांची चर्चा होते. तेव्हा-तेव्हा नाथांच नाव घेतल्याशिवाय ती चर्चा पुढे सरकलीच जात नाही. वेंगुर्लेतील बॅ.नाथ पै यांच स्मारक वेंगुर्ले नगरपरिषद तर्फे बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट संस्थेच्या सहयोगातून हे स्मारक उभे राहिले आहे. ही केवळ एक वास्तू नाही. हे अभ्यास केंद्रच नव्हेतर प्रचंड मोठा विचारांचा वारसा लाभलेल्या एका अभ्यासू आदर्शाची ती वास्तू आहे. बॅ.नाथ पै यांच्या समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. बॅ.नाथ पै यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. बॅ.नाथ पै यांना पाहिलेली अनुभवलेल्या अनेक व्यक्तिंनी आपल्या बोलण्यातून त्यांच्या आठवणी ताज्या केल्या. अभ्यासूपणा आणि वैचारिकतेतून एखाद्या आदर्शाचा पगडा आजही कोकणच्या मनावर आहे. नाथांच्या विचारांनी भारलेली प्रेरित झालेले अनेक आहेत.
नाथांच्या गुणात्मकतेवर प्रेम करणारे त्यांच्या विचारांना, आदर्शांना नतमस्तक होणारेही असंख्य आहेत. या स्मारकातून अभ्यास करून, वाचनातून नवीन पिढीला प्रेरणा देणार काही घडेल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नसावी. नव्या पिढीला वाचता येण्यासारख नाथांच्या कार्य कर्तृत्व समजून घेण्यासारख खूप काही आहे. आजच्या समाजव्यवस्थेत नतमस्तक व्हावे अशी माणस सापडत नाहीत. आदर्श या शब्दाला साजेसे असणारेच दुर्मिळ होत चालले आहेत. आजच्या समाजव्यवस्थेत आदर्शाची व्याख्याच बदलली आहे. यामुळेच दुर्मिळ बनत चाललेल्या व्यक्तिमत्वांमध्ये बॅ.नाथ पै यांच्यासारखा ‘आदर्श’ आजही समाज मनात वेगळ स्थान निर्माण करून आहे. संसदेतल नाथांच कार्य दिल्लीतील संसदेच्या ग्रंथालयात चिरकाल साक्ष देत रहाणार आहेच.
परंतु बेळगावचे असलेले बॅ.नाथ पै यांच वेंगुर्लेशी फार वेगळं अतुट नातं आहे. समाजमनावर चाळीस-पन्नास वर्षे एखाद्या व्यक्तिमत्वाचे अधिराज्य रहाते हे फारच दुर्मिळ आहे. तरूण पिढीलाही बॅ.नाथ पै समजून घ्यावेसे वाटतात. संसदेतील कार्याची माहिती घेण्याचा प्रयत्न होतो. या सर्व गोष्टीतून नाथांचा मोठेपणा त्यांच्या कार्य कर्तृत्वाची उंची हिमालयालाही छोटी ठरवणारी आहे. बॅ.नाथ पै नी १९५७ ते १९७१ याकाळात कोकणातील लोकसभेत्व प्रतिनिधित्व केलं. कोकणातील लोकसंस्कृतीत रमणारे नाथ दशावतार कलेवर प्रेम करीत रात्रभर जागून दशावतारी नाटक बॅ.नाथ पै पहायचे.
नाथांच्या दशावतार कलावंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न बॅ.नाथ पै यांचा राहिला. कोकणातील गोर-गरीब सर्वसामान्य दशावतारी कलावंत केवळ हौस, आवड आणि कोकणातील ही लोक कला टिकून रहाण्यासाठी बॅ.नाथ पै यांना या लोककलेवर प्रेम करत त्याच जतन करणाऱ्या लोककलावंताना प्रोत्साहन मिळावे यासाठीच नाथांचे प्रयत्न होते. नंतरच्याकाळात दशावताराला राजाश्रय मिळत गेला. बॅ.नाथ पै यांच नाव उच्चारताच अशा अनेक आठवणींना उजाळा मिळून जातो. आज कोकणातून धावणारी आणि दक्षिणेकडे जाणारी कोकण रेल्वे बॅ.नाथ पै यांच फार मोठं योगदान आहे.
कोकण रेल्वेचा हा प्रकल्प सुरू होण्यास त्याची पुर्तता होण्यास पुढची अनेकवर्षे लागली. परंतु रेल्वे कोकणात यायला पाहिजे या विचाराला पुष्ठी देत तसे देशाच्या सभागृहात प्रयत्न बॅ.नाथ पै यांनीच केले. नंतरच्याकाळात स्व.प्रा.मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांच्या पुढाकारातून, इच्छाशक्तीतून हा कोकणरेल्वे प्रकल्प पूर्ण होऊ शकला. बॅ.नाथ पै यांच वेंगुर्लेतील स्मारक कोकणातील जनतेसाठी पुढच्या पिढीसाठी आदर्श व्यक्तिमत्वाची साक्ष देणार स्मारक म्हणूनच कोकणवासिय नेहमीच बॅ.नाथ पै यांच्याप्रती आदर व्यक्त करत नतमस्तक होतील एवढ निश्चित !











