जिल्हा नियोजनचे पैसे वैभव नाईकांनी स्वतःसाठी लाटले

भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पुरावेच दाखवले : आ. नाईक यांच्या कारभाराचा केला पंचनामा

मालवण | प्रतिनिधी : भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आ. वैभव नाईक यांच्या कारभाराचा पंचनामा करताना कागदोपत्री पुरावेच सादर केले आहेत. जिल्हा नियोजनच्या निधीची काळजी असल्याचे भासविणाऱ्या आ. वैभव नाईक यांनी कणकवली येथील त्यांच्या घरामागून जाणारी उच्चदाब वीज वाहिनी बदलण्यासाठी जिल्हा नियोजनमधून तब्बल ३२ लाख रूपयांचा निधी खर्च केला. शासकीय निधीची एवढीच काळजी होती, मग स्वतःच्या घरासाठी शासकीय निधी ऐवजी वैयक्तीक खर्च का केला नाही? ३२ लाख रूपयांत अनेक ठिकाणी जनतेच्या विकासाची कामे झाली असती. मात्र आपल्या आमदारकीचा वापर स्वतःसाठी करणाऱ्या वैभव नाईक यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यामुळे नौसेना दिन व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या खर्चावर बोलण्याचा नैतिक अधिकार वैभव नाईक यांना नाही. असा हल्लाबोल भाजप तालुकाध्यक्ष घोडी चिंदरकर यांनी केला आहे.

मालवण भाजपा कार्यालय येथे चिंदरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा तालुका प्रभारी लुडवे, खरेदी विक्री संघाचे संचालक महेश गावकर, शहर प्रभारी संतोष गावकर, सोशल मीडिया पदाधिकारी मनोज हडकर, जॉमी ब्रिटो तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी चिंदरकर यांनी आमदारांनी जिल्हा नियोजन अध्यक्ष तथा पालकमंत्री उदय सामंत यांना दिलेली पत्रे, केलेली मागणी आणि वीज वितरण विभागाकडून करण्यात आलेल्या कामाची कार्यवाही याबाबत कागदपत्रेच सादर केली. तसेच सदरची वाहिनी बदण्यासाठी आणखीही निधीची मागणी नाईक यांनी केली आहे. नाईक यांनी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता, आमदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय निधी वापरण्याची मागणी करत निधी खर्च केलेला आहे, यामुळे त्यांनी भाजपावर टिका करताना स्वतःचे पाहावे. असे सांगताना त्यांना त्याच शब्दात उत्तर दिले जाईल असे चिंदरकर म्हणाले.

नौदल दिनानिमित्तने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यावर टिका करणाऱ्या उबाठाचे आ. वैभव नाईक यांनी आपणही काचेच्याच घरात रहात आहोत हे विसरू नये, असा टोला धोंडी चिंदरकर यांनी लगावला. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आलेले आहेत. यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसून आमदारांना आता विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने सहानभुती मिळविण्यासाठी मालवण कुडाळ मतदार संघातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. यापूर्वीही सिंधुदुर्ग आणि मालवणच्या
दौऱ्यावर आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच इतरही काही मंत्र्यांच्या दौऱ्यावर करण्यात आलेल्या खर्चाचा हिशोब भाजपकडून योग्यवेळी आणि योग्यप्रकारे जनतेसमोर मांडण्यात येणार आहे, असाही इशारा चिंदरकर यांनी दिला आहे.

नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी ५ कोटी ५४ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आलेला होता. मात्र प्रत्यक्षात ३ कोटी ३२ लाख रूपये जिल्हा नियोजन विभागाकडून खर्च करण्यात आलेले आहेत. देशाचे आणि राज्याचे व्हीआयपी येत असताना जिल्हा नियोजन विभागाकडून खर्च करणे अपेक्षितच असते. नियोजनचा झालेला खर्च सिंधुदुर्ग वासियांनी पाहिलेला आहे. यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणे म्हणजे हास्यास्पद घटना आहे. आमदारांनी उच्च न्यायालयात धाव घेण्यापेक्षा मी केलेल्या आरोपांवर उत्तर देऊन स्वतःसाठी वापरलेल्या निधीचा हिशोब मालवण कुडाळच्या जनतेला द्यावा. माझे आरोप खोटे असतील तर माझ्यावर दावा दाखल करावा, असाही इशारा श्री. चिंदरकर यांनी दिला आहे.

काही दिवसांचे आमदार

आमदार वैभव नाईक हे काही दिवसांचेच आमदार राहिले आहेत. त्यांना पराभव दिसू लागल्याने त्यांच्याकडून भाजपावर नाहकपणे टिका केली जात आहे. वारंवार ते नौसेना दिन आणि पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टिका करत आहेत. मालवण कुडाळ मतदार संघातील जनतेने आपला निर्णय केलेला आहे, त्यामुळे सहानभुमी मिळविण्यासाठी आमदारांची धडपड सुरू आहे. भ्रष्टाचाराचे पैसे खासदार नारायण राणेंच्या निवडणुकीत वापरल्याचा आरोप नाईक करत आहेत, मात्र त्यांच्याकडे याबाबत कोणताही पुरावा नसताना जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून आपला फायदा साधण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. या मतदार संघात यावेळी परिवर्तन निश्चीत असून आमदारांच्या टिकेला मतदारच उत्तर देणार आहेत, असेही चिंदरकर म्हणाले. तसेच यापूर्वी वादळ नुकसानीत मंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला मदतीसाठी ट्रक भरून साहित्य पाठवले. मालवणात हे साहित्य कोणाच्या घरात गेले? जनतेच्या नावाने ती मदत कोणी लाटली याचेही पुरावे आमच्याकडे असल्याचे धोंडी चिंदरकर म्हणाले.