लांजा साटवली मार्गावर दुतर्फा वाढलेली झाडी ठरतेय अपघातास निमंत्रण

 

बुधवारी झालेला अपघात त्याचेच प्रतीक, ग्रामस्थांतून तीव्र संताप

लांजा( प्रतिनिधी )लांजा साटवली या सागरी मार्गाच्या दुतर्फा सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढली असून एखादे वाहन आल्यास समोरून झाडीमुळे दिसत नसल्याने अपघाताची शक्यता व्यक्त
होत आहे. आज बुधवारी गोळवशी येथे एसटी आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघात हा याच कारणातून झाल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले .

 

 

लांजा साटवली हा कायम वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर दहा ते बारा गावे येत असल्याने यावरून एसटीसह अन्य खाजगी वाहनांची दररोज, सतत रहदारी सुरू असते. या मार्गावर खावडी गावाच्या पुढे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत .वळणाच्या ठिकाणी या झाडाझुडपांमुळे समोरून येणारे वाहन देखील स्पष्ट दिसत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच ही झाडी अपघातास कारणीभूत ठरत आहे. आज बुधवारी एसटी आणि मोटरसायकल यांच्यात झालेला अपघात हा याच कारणामुळे झाल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले .
त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरणारी ही झाडे झुडपे तोडून रस्ता मोकळा करावा आणि संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी या मार्गावरील प्रवास करणारे वाहन चालक, प्रवासी आणि ग्रामस्थ यांच्यातून केली जात आहे.