वेंगुर्ले महाविद्यालयातील “औषधी वनस्पतींचे प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यशाळे”ला चांगला प्रतिसाद..

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी :बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला व रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात “औषधी वनस्पतींचे प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद लागला.

ह्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. उमेश पवार सर (सहाय्यक प्राध्यापक – पदवीत्तर पदवी विभाग – श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी) हे लाभले होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थी – विद्यार्थीनींना आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध औषधी वनस्पतींची माहिती दिली. तसेच औषधी वनस्पतींच्या विषयामध्ये असणाऱ्या संशोधन संधीबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी बॅ. बाळासाहेब खर्डेकर साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन “कृष्णवडास” जल अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. चौगुले सर यांनी भूषविले. यावेळी श्री. रॉकी देसा (राऊंड ऑफिसर, वनविभाग आजरा) हे उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयास २०० औषधी वनस्पती देणार असल्याचे सांगितले.

ह्या कार्यक्रमाला कु. नेहा गावडे हिने “फ्लोरल ड्रिंक” वर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. प्रदर्शनामध्ये ५० विविध औषधी वनस्पती त्यांच्या माहितीसहीत मांडण्यात आल्या होत्या. तसेच औषधी वनस्पतींची विविध पुस्तके देखील मांडण्यात आली होती. यावेळी ग्रीन नेचर क्लबच्या प्राध्या. डॉ. धनश्री पाटील मॅडम, रोटरॅक्ट क्लबचे सेक्रेटरी प्राध्या. रोट. प्रितीश लाड उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी – विद्यार्थीनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.