कोल्हापूर :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री, खान्देश भूषण दाजीसाहेब तथा रोहिदास चुडामण पाटील यांचे आज सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दाजीसाहेबांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे पुत्र आमदार कृणाल पाटील, विनय पाटील असा परिवार आहे.
वयोमानामुळं दाजीसाहेब पाटील यांच्या प्रकृतीत सातत्यानं चढउतार होत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची फुफ्फुसं कमी क्षमतेनं काम करत असल्याचं निदान झालं होतं. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर अलीकडं पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
दाजीसाहेब पाटील यांची अंत्ययात्रा शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता धुळ्यातील देवपूर येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघेल आणि एस एस व्ही पी एस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी, सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.












