तुमच्या इथे डम्पिंग ग्राउंड होणार नाही याची ग्वाही  मी देते- उल्का विश्वासराव 

 

 

कोत्रेवाडी येथील नवलादेवी मंदिरात पार पडली ग्रामस्थां समवेत बैठक 

संतोष कोत्रे l        लांजा -: कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प होणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देते. आणि यासाठी तुमच्या सोबतच नाही तर तुमच्या पुढे एक पाऊल मी राहते, अशी ग्वाही भाजपाच्या लांजा राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी कोत्रेवाडी ग्रामस्थांना दिली .

कोत्रेवाडी येथील नगरपंचायतीकडून प्रस्तावित असलेल्या डंपिंग ग्राउंड संदर्भात भाजपाच्या नेत्या आणि राजापूर लांजा विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी गुरुवारी रात्री नवलादेवी मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना उल्का विश्वासराव यांनी सांगितले की, कोणताही प्रकल्प येत असेल तर त्याला विरोध नाही. पण तो योग्य पद्धतीने झाला पाहिजे, ही जबाबदारी तेथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची असते. आपल्या येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प होत आहे हे मला समजले आणि याचा सर्वांनाच भविष्यात त्रास होऊ शकतो, याची मी सर्व प्रकारे माहिती घेतली आहे. आता तुम्ही काही काळजी करू नका. आपण नवलादेवी मंदिरात आल्यानंतर देवीची प्रार्थना केली आहे की ज्या कामाला आलो आहे त्यात यश मिळू दे.

आपल्या कोत्रेवाडी येथे होणाऱ्या प्रकल्पालागत लोकांची घरे आहेत, शेत जमिनी व जलस्रोत आहेत. असे असतानाही या ठिकाणी जर प्रकल्प होत असेल तर त्यामध्ये नक्कीच कोणी लोकप्रतिनिधीचा हात आहे आणि ते निश्चितच दिसून येत आहे. मात्र तुम्ही काही काळजी करू नका. मी हा विषय पूर्णपणे माझ्या हातात घेतला आहे आणि तो मी पूर्णत्वास लावणार आहे.

उल्का विश्वासराव पुढे म्हणाल्या, की तुम्ही ज्या विश्वासाने माझ्याकडे आलात आता माझी जबाबदारी आहे. आणि तुम्ही सर्वजण कागदोपत्री बरोबर आहात आणि अशाप्रकारे योग्य जागेवर हा डंपिंग प्रकल्प होण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे हा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प आपल्या येथे होणार नाही याची काळजी मी घेईन. आणि त्यासाठी तुमच्याबरोबरच नाही तर तुमच्या पुढे एक पाऊल मी असेन असे ठोस आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

बैठकीच्या सुरुवातीला उल्काताई विश्वासराव तसेच महिला पदाधिकारी सौ. खामकर, यांचे स्वीय सहाय्यक कदम त्याचप्रमाणे लांजाचे खोत आणि भाजपाचे पदाधिकारी विजय कुरूप यांचा देखील यावेळी ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. या बैठकीला कोत्रेवाडी येथील ग्रामस्थ, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.