लांजा नगरपंचायत विकास कामांची निविदा उघडणार ४ ऑक्टोबर रोजी

काँग्रेसच्या आंदोलनाची दखल, दिला होता इशारा

लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका काँग्रेसने दिलेल्या आंदोलनाची दखल घेत विकास कामांच्या निविदा ४ ऑक्टोबर रोजी उघडण्यात येतील असे स्पष्टीकरण लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी कळविले आहे.
लांजा नगरपंचायतीमार्फत नगरपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या विकास कामांची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा २० जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच विकास कामांची निविदा उघडण्याची अंतिम तारीख २ ऑगस्ट होती. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी देखील नगरपंचायतीमार्फत ही निविदा उघडली गेली नसल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा या विरोधात २ ऑक्टोबर रोजी उपोषणास बसण्याचा इशारा लांजा तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता. त्याबाबतची निवेदन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट्ये ,शहराध्यक्ष रवींद्र राणे, उप तालुका अध्यक्ष मकरंद जोशी यांनी दिला होता.

 

 

त्याच्या या आंदोलनाची दखल घेत लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी काँग्रेस पदाधिकांन्या निवेदन दिले आहे. आपल्या नगरपंचायत कार्यालयातील अभियंता यांचे पद रिक्त असल्याने त्याबाबतची कार्यवाही प्रलंबित होती. परंतु ३० सप्टेंबर रोजी यतिराज जाधव, स्थापत्य अभियंता रत्नागिरी नगर परिषद यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला असून त्यांच्यामार्फत प्राप्त निविदा धारकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र निविदाधारकांची वित्तीय बोलीचा लिफाफा दिनांक ४ ऑक्टोबर पर्यंत उघडण्यात येईल असा प्रकारचे पत्र नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी काँग्रेस तालुकाध्यक्ष यांना दिले आहे.