मनाच्या स्वच्छतेसाठी सकस वाचनाची गरज : मुख्याधिकारी परितोष कंकाळ 

 

वेंगुर्लेत आंनदयात्री वाङमय मंडळातर्फे ‘जागर साहित्याचा’ उपक्रमाचा शुभारंभ..

वेंगुर्ले l दाजी नाईक :आनंदयात्री वाङमय मंडळाने हाती घेतलेले कार्य अतिशय स्तुत्य आहे. मुलांमध्ये साहित्याची अभिरुची वाढणे ही काळाची गरज आहे. आजच्या पिढीला मोबाईलच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी वाचनाचा व्यासंग वाढला पाहिजे. वेंगुर्ले नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच तालुक्यातील साहित्यिकांचे साहित्य उपलब्ध असलेले दालन सुरू करण्यात येईल. यातून मनातील कचरा स्वच्छ करण्यासाठी सकस विचारांची बैठक तयार करता येईल, असे प्रतिपादन वेंगुर्ले नगरपालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.

वेंगुर्ला हायस्कूलमध्ये थोर साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आनंदयात्री वाङमय मंडळाने आयोजित केलेल्या साहित्य जागर उपक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी, प्रसिद्ध मालवणी कवी विनय सौदागर, वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, आनंदयात्रीचा अध्यक्षा तथा ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, सातेरी देवस्थानचे मानकरी रवींद्र परब, चारुता दळवी, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. डी. कांबळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचे आनंदयात्रीच्या अध्यक्ष वृंदा कांबळी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सचिव प्रा. सचिन परुळकर यांनी केले. प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुलांमध्ये वाचनाची अभिरुची निर्माण व्हावी व मुलांना वाचनाची सवय लागावी, हा उद्देश कार्यक्रम राबविण्यामागचा आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून मुले वाचनाकडे वळतील. त्यांच्यात वाचन करण्याची उत्सुकता निर्माण होईल, असा विश्वास यावेळी बोलताना पी. डी. कांबळी यांनी व्यक्त केला.

सरकारतर्फे साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत महाराष्ट्रातील चारच साहित्यिकांना मिळाला आहे. त्यातील वि. स. खांडेकर व विंदा करंदीकर हे या सिंधुदुर्गच्या मातीत घडलेले साहित्यिक आहेत. याचा आपणाला गर्व असायला हवा. आपल्या जिल्हयातील साहित्यिकाचे साहित्य सहज उपलब्ध व्हावे असे केंद्र जिल्हयाच्या ठिकाणी व्हायला हवे. यातून नवसाहित्यिकांना उर्जा मिळेल, असे प्रतिपादन यावेळी बोलताना जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी यांनी केले. छोट्या छोट्या उपक्रमातूनच लहानमुलांमध्ये वाचनाची अभिरुची निर्माण होईल. पुढची पिढी सक्षम घडवायची असेल तर याची नितांत गरज आहे. त्यांना कळेल, उमजेल, त्यांत त्यांना रस वाटेल अशारितीने त्यांच्याशी व्यक्त झाल्यास मुले साहित्यातही रस घेऊ लागतील, असे मालवणी कवी विनय सौदागर म्हणाले

दरम्यान, आनंदयात्रीच्या सदस्य फाल्गुनी नार्वेकर यांनी जागर साहित्याच्या या उपक्रमावर आधारित गीत सादर केले, तर कवी स्वप्निल वेंगुर्लेकर यांनी कार्यक्रमादरम्यान रचलेले काव्य कार्यक्रमाच्या शेवटी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले. आनंदयात्री संजय पाटील, प्रितम ओगले, महेश राऊळ, विशाखा वेंगुर्लेकर, जान्हवी कांबळी, विकास कांबळी वेंगुर्ले हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

*जयवंत दळवींचे साहित्य मानसशास्त्रीयदृष्ट्या प्रगल्भ करणारे : वृंदा कांवळी*

जागर साहित्याचा उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना वृंदा कांबळी म्हणात्त्या की, जयवंत दळवी हे आपल्या भागाचे खुप मोठे साहित्यिक आहेत. त्यांनी आपल्या सिंधुदुर्गातील माणसाला, निसर्गाला केंद्रबिंदू ठेवून साहित्याची निर्मिती केली. त्यांच्या साहित्यातील असंख्य माणसे आजही आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात. ही सर्व पात्रे जगण्याचे तत्वज्ञान देत राहतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खुप काही आहे. त्यांच्या अभ्यास करून सक्षम नागरिक होण्यासाठी आपले पाऊल आपण अधिक मक्कम करु शकतो. दळवींचे साहित्य मानसशास्त्रीय दृष्ट्या माणसाला अधिक प्रगल्म करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, असेही त्या म्हणाल्या.