वेंगुर्ले l प्रतिनिधी :रेडी शिरोडा रस्त्यावरील राऊतवाडी–शिरोडा परिसरात असलेल्या अनधिकृत स्पीड ब्रेकर मुळे वारंवार अपघात होत आहेत. तरी हे सर्व अनधिकृत व अवैध धोकादायक स्पीड ब्रेकर हटवावेत आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे विश्वनाथ उर्फ सिद्धेश शेलटे यांनी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वपरवानगी न घेता हे स्पीड ब्रेकर बांधले आहेत. या स्पीड ब्रेकरांवर पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या रिफ्लेक्टिव्ह पट्ट्या लावण्यात आलेल्या नाहीत. हे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. वारंवार या भागात छोट्या-मोठ्या वाहनांचे अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या स्पीड ब्रेकरवर रिफ्लेक्टिव्ह मार्किंग, व आगाऊ सूचना-फलक असणे अत्यावश्यक आहे मात्र ते नाही. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना कराव्यात. अन्यथा आम्हाला या प्रकरणी कायदेशीर कारवाई व न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागेल असे या निवेदनात विश्वनाथ उर्फ सिद्धेश शेलटे यांनी म्हटले आहे.













