
देवीचे भक्त विकास शेट्ये यांनी स्वखर्चाने बनवला चांदीचा मुखवटा
संतोष कोत्रे | लांजा-: लांजा शहरातील तमाम वैश्य बांधवांचे आराध्य दैवत आणि शेट्ये घराण्याची कुलस्वामिनी असलेल्या श्री देवी भगवतीला यावर्षी दोन किलो चांदीचा मुखवटा बनवण्यात आला आहे. देवीचे भक्त विकास शेट्ये यांनी हा मुखवटा स्वखर्चाने बनवला आहे .या मुखवट्याची आज गुरुवारी सकाळी मिरवणूक काढण्यात आली .
लांजा शेट्येवाडी स्थित असलेले श्री देवी भगवती हे शहर परिसरातील तमाम वैश्य समाज बांधवांचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. वैश्य समाजातील बुजुर्ग व्यक्तिमत्व असलेल्या कै. विष्णू भाई शेट्ये यांच्या प्रेरणेतून ४० वर्षांपूर्वी श्री देवी भगवतीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि सद्यस्थितीत हा उत्सव अतिशय दिमाखात साजरा केला जातो .श्रीदेवी भगवतीचे २७ मे १९८४ रोजी मंदिर बांधून तिची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे भाविकांच्या नवसाला पावणारी, त्यांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिची ओळख आहे .
देवीचे भक्त असलेले विकास शेट्ये यांनी गतवर्षी २ किलो चांदीचे हात व पाय व हार बनविले होते.यावर्षी हा विकास शेट्ये यांनी सौ. वृंदा विकास शेट्ये यांना मिळालेल्या प्रेरणेमुळे चांदीचा २ किलोचा मुखवटा बनवला आहे. देवीच्या या चांदीच्या मुखवट्याची आज गुरुवारी सकाळी ८ वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत विकास शेट्ये कुटुंबीय व मोठ्या प्रमाणात वैश्य समाज बांधव सहभागी झाले होते .त्यानंतर विधीवत शुद्धीकरण विधी करण्यात आला. देवीची घटस्थापना शेट्ये यांच्या मूळ घरात केली जाते आणि नऊ दिवस उत्सव साजरा केला जातो.










