विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार बदलावा याकरिता भारतीय जनता पक्ष आग्रही- जिल्हाध्यक्ष केदार साठे

 

मंडणगड l प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी महायुतीतील सर्वच घटक पक्ष व महायुतीचा सन्मान करते पंरतु लोकसभेच्या निवडूकीतील दापोली मतदार संघातील साडे आठ हजार मतांची पिछाडी ही विधानसभेकरिता ही जागा धोक्यात असल्याचे संकेत देते आहे. त्यामुळे (शिंदे) शिवसेनेने विधानसभेचा आपला उमेदवार बदलावा या करिता भारतीय जनता पार्टी आग्रही असल्याचे व तसे न झाल्यास त्याचा फटका महायुतीस निवडणुकीत बसणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी मंडणगड येथे केले. 3 ऑक्टोंबर 2024 रोजी पार्टीचेवतीने खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार व तालुक्यातील कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता या कार्यक्रमात ते बोलते होते. या कार्यक्रमास खासदार धैर्यशील पाटील, तालुका अध्यक्ष लक्ष्मण मोरे, मकरंद म्हादलेकर, प्रकाश शिगवण, श्रीराम इदाते, विश्वदास लोखंडे, स्मिता जावकर, अजय दळवी, श्वेता महाडीक, वंसत सुतार, प्रविण कदम, गिरीष जोशी, यश मेहथा, महेश कंचावडे, वैभव नारकर, तुषार येरुणकर, अशोक गोविलकर, विजय दरिपकर, प्रभाकर पेंडसे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले भारतीय जनता पार्टी हा संघर्ष करत विचार धारेतून निर्माण झालेला पक्ष आहे. दोन खासदार ते स्वबळावर सत्ता असा प्रवास केला आहे. पक्षासाठी त्याग करुन काम करण्याचा संस्कार कार्यकर्त्यांना लाभला आहे. आम्ही पगारी नव्हे तर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमच्या पक्षाचा विस्तार करण्याचा आम्हाला अधिकार आहे. मतदार संघात आम्ही लोकहिताची कामे करणार नाही व दुसऱ्यांनी केली तर आम्ही करुन देणार नाही ही निती सोडा असे आवाहन करताना ते पुढे म्हणाले महायुतीतील शिवसेना हा मित्र पक्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचा नेहमीच दुस्वास करत आहे. कोकणचे नेते रामदास कदम येऊ घातलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शितासाठीही शिल्लक न ठेवण्याच्या वल्गना करत आहेत त्यामुळे आमदार योगेश कदम यांनी भारतीय जनता पक्षा संदर्भातील आपली भुमीका स्पष्ट करावी आम्ही त्यांचा मनमानी कारभार व चुकांवर खुल्या दिलाने टिका केली आहे. पक्ष व आमच्या नेत्यांचा अवमान पक्षाचे स्वाभीमानी कार्यकर्ते कधीही सहन करणार नाहीत. दापोली मतदार संघात पक्ष प्रवेशाचे वेगवगेळ्या तऱ्हा व हातखंडे अजामावले जात आहे. शिवसेनेचे कार्यकर्तेच सेनेत नव्याने प्रवेश करीत आहेत. या विपरीत परिस्थितीतही खिसे गरम करुन स्वाभीमान गहाण टाकण्यापेक्षा राजकारणात उज्वल भविष्य असलेल्या भारतीय जनता पार्टीकडे आशेने पाहून मोठ्या संख्येने लोक प्रवेश करीत आहे. या परिवर्तनाची आता सवय लावून घ्या असा सल्ला दिला. यावेळी खासदार धैर्यशिल पाटील, प्रकाश शिगवण, स्मिता जावकर, भाऊ इदाते यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका अध्यक्ष लक्ष्मण मोरे यांनी प्रस्ताविक केले. सुत्रसंचालन विश्वदास लोखंडे यांनी केले.