नवरात्रोत्सावनिमित्त तुळस येथे काढलेल्या ‘दुर्गा माता दौड’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद…

 

वेंगुर्ले : दाजी नाईक : तुळस येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सिंधुदुर्ग शाखेतर्फे आणि तुळस येथील हिंदु धर्माभिमानी यांच्या वतीने रविवारी सायंकाळी तुळस येथे नवरात्रोत्सावनिमित्त ‘दुर्गा माता दौड’ चे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये मोठ्या संख्येने हिंदु बांधव आणि भगिनी सक्रिय सहभागी झाले होते.
“दुर्गामाता दौड” या शंब्दातच फार मोठी ताकद, स्फूर्ती, तेज व आत्मविश्वास आहे. पृथ्वीतलावर जेव्हा जेव्हा संकट येते, तेव्हा तेव्हा आई जगदंबा दुर्गेचा अवतार घेते व त्या संकटाचा नाश करते.
तुळस येथे सुमारे ५०० नागरिक, महिला, युवक, युवती यांच्या सहभागात ही दौड सुरू झाली. सर्वांनी रांगोळ्यांच्या पायघड्या व फुलांची उधळण करीत स्वागत व औक्षण करत परमपवित्र भगव्या ध्वजाच्या मागून दौड मध्ये सहभाग घेतला. मार्गदर्शक म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील उपस्थित होते.
तुळस येथील श्री सातेरी मंदिर कडून या दौडीस प्रारंभ झाला. त्यानंतर गावातून ही दौड काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय व धर्मरक्षक संभाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. श्री. रामेश्वर मंदिर तुळस येथे प्रार्थना घेऊन या दौड चा समारोप झाला.