शेतीसाठी फुड सिक्युरिटी आर्मी : मूर्तीकारांना कॉम्प्रेसरसाठी अनुदान
दशावतारांच्या वाहन खरेदीसाठीही सबसिडी
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधूरत्न योजनेतून अनेक क्रांतिकारक निर्णय घेण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. फूड सिक्युरिटी आर्मी, दशावतारांच्या वाहनाला सबसिडी, मच्छी विक्रेत्या महिलांना इ स्कूटर, गणेश मूर्तीकरांना कॉम्प्रेसरसाठी अनुदान, मच्छीमारांसाठी आऊट बोट, इन्सुलेटेड व्हॅन,
तिलारीत अम्युझमेंट पार्क, सावंतवाडीत व वेंगुर्लेत लेझर फाउंटन, पारपोली येथे ट्री हाऊस , फुलपाखरू उद्यान अशा अनेक गोष्टींसाठी सिंधू रत्न योजनेमधून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक समृद्धी यावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, अत्याधुनिक शेतीसाठी ‘फूड सिक्युरिटी आर्मी’ बनविण्यात आली असून १४ गटातील १४० प्रशिक्षणार्थी लष्करातील सेवेप्रमाणे शेतीच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवतील, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याला तीन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे तसेच जिल्ह्यात मच्छी विक्रीसाठी महिलांना ५१ ई स्कूटर देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लष्कराच्या सेवेप्रमाणे फूड सिक्युरिटी आर्मी बनविण्यात आली आहे. या चौदा गटांच्या प्रशिक्षणार्थीत १४० जणांचा समावेश आहे, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक साहित्यासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भात लावणी ते कापणी पासून सर्व कामे ते करतील असे केसरकर यांनी सांगून हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेती व्यवसायामध्ये क्रांतिकारक बदल होईल असे ते म्हणाले.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूर्तीकराना हस्तकलेची प्रगती साधण्यासाठी कॉम्प्रेसरसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे.जिल्ह्यातील दशावतारी कंपन्या गावात जाऊन कलेचे प्रदर्शन करतात त्यांच्यासाठी वाहन घ्यावे म्हणून दोन कोटी ७० लाख रुपयांची सबसिडी मंजूर करण्यात आली आहे. तर मच्छीमारांसाठी आऊट बोट, इन्सुलेटेड व्हॅन सर्व तालुक्यांना समान वाटप करण्यात आले आहेत.
दरम्यान, तिलारी तेरवण मध्ये बंधाऱ्याच्या ठिकाणी रेस्टॉरंट काम पूर्ण होत आहे. तेथे अधिकच्या दहा रूम बनवण्यात येत असून तिलारी पर्यटनास त्यामुळे सुरुवात होईल तिलारीत अम्युझमेंट पार्क टेंडर लवकरच निघेल त्यामुळे पर्यटनाचा मोठा टप्पा तिथे घातला जाईल. केसरी या ठिकाणी नगरपालिकेची ब्रिटिश कालीन नळपाणी योजना आहे. या ठिकाणी विश्रामगृह आहे. तेथे आणखी दहा अतिरिक्त खोल्या उपलब्ध झाल्यास वीस जणांची राहण्याची सोय होईल आणि तो पर्यटनासाठी लाभ होईल केसरीची नळपाणी योजना ही निसर्गरम्य वातावरणात अभ्यासासाठी चांगली आहे. त्यामुळे केसरी गाव”पाणी योजना” म्हणून जाहीर होईल त्यामुळे नक्कीच पर्यटक तिथे येतील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऍक्युरिझम सेंटर निर्माण केले आहे त्यामुळे केसरी गावात पर्यटनाला वाव आहे.
ते म्हणाले,पारपोली येथे फुलपाखरू उद्यान आहे त्या ठिकाणी ट्री हाऊस मंजूर करून झाडावरच्या घरामध्ये पर्यटकांना स्थान दिले जाणार आहेत. पारपोली ते आंबोली धबधबा या दरम्यान संस्थांनकलीन पायवाट विकसित केली जाणार आहे. शिरशिंगे धरणाचे काम लवकरच सुरू होईल. ते म्हणाले, महिला बचत गट डीआरडीओ च्या महिलांना अत्याधुनिक चार बसेस व चार हाऊस बोट देऊन पर्यटनात क्रांतिकारक पाऊल टाकले जात आहे.
गेळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी पैसे मंजूर करण्यात आले आहे. सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गेळे जमिनीचे लवकरच वाटप होईल.आंबोलीचे जमीन वाटप करण्यापूर्वी सर्वे मोजणीला सुरुवात होईल.
तर काजू बोंडे रस काढण्यासाठी १४० शेतकऱ्यांना मशीनरी दिली असून तो रस कृषी विद्यापीठाकडे दिल्यानंतर ते त्याच्यावर प्रकिया करतील. त्यासाठी एक कोटी ८६ लाख रुपये कृषी विद्यापीठाला मंजूर केले आहेत. जिल्ह्यात देशी गाईची २६१ युनिट मंजूर केले असून बांबू प्रक्रिया उद्योग सुरू होणार आहे. येत्या महिन्याभरामध्ये जिल्ह्यात एक लाख अंडी निर्माण होतील आमचे उद्दिष्ट दीड लाख अंड्यांचा आहे ह्या महिला बचत गट व महिलांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे एक लाख रुपये प्रतिवर्षी महिलांना आर्थिक बळ मिळणार आहे. भाताच्या उत्पादन वाढीसाठी श्री पद्धतीची प्रोत्साहन दिले आहे. दोडामार्ग तालुक्यामध्ये ६०० हेक्टरवर प्रायोगिक तत्त्वावर हळद लागवड केली आहे तिला चांगला दर मिळाला आणखी त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
केसरकर म्हणाले, दोडामार्ग तालुक्यातील रेशीम उद्योग मध्ये आणखी वाढ करण्याचा प्रयोजन आहे. तोंडवली पर्यटन केंद्र वनखात्या मार्फत सुरू होईल. आंबोली फुलपाखरू उद्यान आहे. धबधब्याकडे जाण्यासाठी पाऊलवाटा केलेल्या आहेत. सिंधू रत्न योजनेतून ठिकठिकाणी ट्रान्सफॉर्मर दिले आहेत.
सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साकारल्यास उपजिल्हा रुग्णालय आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी २०० बेड निर्माण होणार आहेत. सावंतवाडी बस स्थानक बांधवापरा तत्वावर विकसित करण्यात येणार आहे. आडाळी एमआयडीसी भागात ८४ इंडस्ट्रीसाठी भूखंड आरक्षित असून फार्माचे १२ ते १४ उद्योग येतील. या ठिकाणी लाईट पाणी सोय झाली पाहिजे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस वर जिने रेस्टॉरंट केले जाईल.वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या फाउंटन लेझर शो मंजूर आहे. विजयदुर्ग आरमार सृष्टीसाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच गोड्या पाण्यातील माशांचे केंद्र निर्माण केले असून शोभिवंत मासे उद्योग उभे केले. अशा विविध पातळ्यांवर सर्व क्षेत्रात जिल्ह्याच्या आर्थिक क्रांती घडविणाऱ्या योजना सिंधूरत्न मधून मंजूर केल्या आहेत, असे केसरकर यांनी सांगितले.











