परतीच्या पावसाचा राजापूरला जोरदार तडाखा
तालुक्यात विजपुरवठा विस्कळीत तर भातशेतीचेही मोठे नुकसान
राजापूर (प्रतिनिधी): मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या परतीच्या पावसाचा राजापूरला जोरदार तडाखा बसला आहे. तालुक्यातील अनेक भागात विजपुरवठा विस्कळीत झाला असून तुळसुंदे उगवती वाडी येथील रहिवासी नरेश आंबेरकर यांच्या घरावर रात्री वीज पडून भिंतीला भगदान पडले आहे. तसेच इलेक्ट्रीक सामान व मीटर जळला आहे सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. तर कारीवणे चांदवणवाडी येथील विज पोल व ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे वाकले असुन अनेक भागात विजपुरवठा खंडीत झाला आहे.
तर या परतीच्या पावसामुळे कापणीला आलेली भातशेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून अनेकांचे कापून शेतात ठेवलेले भात पिक भिजले आहे. प्रशासनाकडून तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार विकास गंबरे यांनी दिले आहे.
राजापूर शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यात विजांचाही मोठा कडकडाट होता. याचा फटका तालुक्याच्या ग्रामीण भागात बसला आहे. अनेक भागात विजपुरवठा खंडीत झाला असून विज वाहिन्या व पोल वाकले आहेत. महावितरणकडून तातडीने काम हाती घेण्यात आले आहे.मात्र बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत काही भागात विजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.
या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकाची नासाडी झाली आहे . त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. कापणीला आलेले भातपिक भिजले आहे. तर काही ठिकाणी शेतात कापून ठेवलेले भातपिक भिजले आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसाचा ईशारा देण्यात आल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.











