भाजप संपवण्यासाठी प्रयत्न केले; हिंदुत्वाची कुचेष्टा केली अशा व्यक्तीला निवडून द्यायचे नाही

 

भाजपा नेते बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्याचा बैठकीत निर्णय 

रत्नागिरी : ज्याने भाजप संपवण्यासाठी वीस वर्षे प्रयत्न केले आणि हिंदुत्वाची कुचेष्टा केली अशा व्यक्तीला निवडून द्यायचे नाही, असे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज झालेल्या बैठकीत ठरवले. सर्व गोष्टी जाहीर होणार नाहीत, परंतु रत्नागिरीकरांना परिवर्तन हवे आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहिलेला नसून परिवर्तनाच्या लाटेत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ सामील होईल, असे पदाधिकाऱ्यांनी ठरवले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजप एकही जागा लढवणार नाही, अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आज महत्त्वाची बैठक भाजप जिल्हा संपर्क कार्यालयात घेण्यात आली.

याप्रसंगी बाळ माने भावनिक झाले आणि म्हणाले की मी ३५ वर्षे भाजपचा निष्ठावंत म्हणून काम करतोय. हिंदुत्वासाठी, पक्षासाठी सर्व ते योगदान दिले आहे. रत्नागिरीकरांना परिवर्तन हवे आहे. परिवर्तन अटळ आहे, ही काळाची गरज आहे. भाजप संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले परंतु आजही भाजपची ताकद कमी झाली नाही तर ती वाढतच आहे. खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पाठबळ भाजपला मिळते आहे. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघात परिवर्तन झाले, याचे श्रेय आपल्या कार्यकर्त्यांनाच द्यावे लागेल. आता विधानसभेसाठीही परिवर्तन होणे आवश्यक आहे.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने यांच्यासमवेत मंडल अध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, सौ. वर्षा ढेकणे, प्रशांत डिंगणकर, सतेज नलावडे, शहराध्यक्ष राजन फाळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सतेज नलावडे यांनी सांगितले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाचे मतदान महत्वाचे ठरणार आहे. रत्नागिरीत हिंदुत्वाची कुचेष्टा करणाऱ्यांना मतदान करायचे नाही, अशीच सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. अशा व्यक्तीला रत्नागिरीकर स्वीकारणार नाहीत. त्यामुळे विधानसभेतील अनुभवी व्यक्तीला निवडून देण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले की, सोयीस्कररित्या आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेणाऱ्या नेत्यांना निवडून द्यायचे नाही, असे कार्यकर्त्यांच्या मनात आहे. सर्वच गोष्टी सांगितल्या जाणार नाहीत. घोडेमैदान दूर नाही. कोकणचे नेते, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण हे आपल्याला योग्य ते आदेश देतीलच. आपण आपल्या बूथ कमिट्या सज्ज करूया. कार्यकर्त्यांच्या भावना मी जाणून घेतल्या आहेत. त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.