वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग येथे साकारणारे फिशिंग व्हिलेज हे येथील मच्छीमारांना रोजगाराचे दालन ठरणार आहे. गेली दहा वर्ष या प्रकल्पाच्या आड आलेल्या विविध अडचणी मंत्री दीपक केसरकर यांच्या मुळे दूर झाल्या आहेत. आणि आता हा प्रकल्प मार्गी लागत आहे याचे समाधान आहे. चांदा ते बांदा योजनेतून या प्रकल्पावर तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये खर्च होणार आहेत. आज या प्रकल्पाचे भूमिपूजन सर्वांच्या साक्षीने होत आहे. त्यामुळे विकासकामांचा द्यास घेतलेल्या मंत्री केसरकर यांच्या मागे सर्वांनी ताकतीने उभे राहूया असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी केले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून चांदा ते बांदा योजना व जिल्हा नियोजन पर्यटन विभागा मार्फत सुमारे ३.५० कोटी रुपयांच्या मंजूर करण्यात आलेल्या फिशिंग व्हिलेजचे भूमिपूजन येथील जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुका संघटक बाळा दळवी, दत्ता साळगावकर, नयन पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ मच्छिमार लक्ष्मण कोळमकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी मच्छिमार नेते गणपत केळुस्कर, प्रकाश मोटे, आनंद वेंगुर्लेकर, जेष्ठ मच्छीमार सुबोध खडपकर, सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्लेचे उप अभियंता श्री. आडोळे, पोलीस पाटील रुची केळूसकर, बचतगटाच्या हरमानी खराडे यांच्यासाहित मच्छिमार बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सचिन वालावलकर म्हणाले की, सध्या मच्छीमारांना मासेमारीची परिस्थिती माहित आहे. या मत्स्य व्यवसायाला जोडधंदा म्हणून फिशरीत व्हीलेज महत्त्वाचा प्रकल्प आहे. दूरदृष्टीचा विचार करून मंत्री केसरकर यांनी हा प्रकल्प आपल्या उभादांडा गावात आणला आहे
गेले तीन टर्म या भागाचे आमदार म्हणून नेतृत्व करताना दीपकभाई केसरकर यांनी नेहमी या मतदारसंघा कडे विकासात्मक दृष्टीने पाहिले. झुलता पूल असो, बॅक वॉटर असो, रस्ते, पाणी यासह सर्वच बाबतीत करोडो रुपयांचा निधी या मतदारसंघात आणला. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदार समाधानी असला पाहिजे हाच त्यांचा हेतू आहे. नवाबाग येथील हा प्रकल्प करतानाही स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊनच प्रत्येक काम केले जाणार आहे असेही श्री.वालावलकर यांनी सांगितले. तसेच यानंतर सिंधूरत्न योजनेतुन २.५० कोटी रकमेच्या गाडीअड्डा येथे जापनीज झेन गार्डन विकसित करणे या कामाचे भूमिपूजन सचिन वालावलकर यांच्या हस्ते तर येथील जिल्हा परिषद शिवाजी प्रागतिक येथे नेताजी सुभाष चंद्र बोस निवासी शाळेचे बांधकाम करणे या ६ कोटी ६४ लाख कामाचे भूमिपूजन शहरप्रमुख उमेश येरम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उभादांडा गावाच्या दृष्टीने नवाबाग येथे मंत्री दीपक केसरकर यांच्यामुळे आलेला फिशरीज व्हिलेज हा प्रकल्प या भागातील नागरिकांना जीवनमान उंचावण्यासाठी चांगला प्रकल्प आहे. असे मत सरपंच निलेश चमणकर यांनी यावेळी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे पर्यटनावर या भागाचा विकास अवलंबून आहे. येथील नागरिकांनी या प्रकल्पात सहभागी झाले पाहिजे. देशातील आणि प्रदेशातील पर्यटक येथे येणार तेव्हा त्यांना लागणाऱ्या सुविधा पर्यटनाच्या माध्यमातून आपण येथे दिल्या तर ते येथे थांबतील आणि त्यातूनच आपली आर्थिक उन्नती होणार आहे असेही श्री.चमणकर यांनी यावेळी सांगितले.












