पंचनामे करून भरपाई देण्याची प्रमोद गावडे यांची मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : परतीच्या पावसाने भात शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केली आहे.
ते म्हणाले, हवामान बदलामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदाच्या हंगामात पावसाचा समतोल ढासळल्याने नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे जातोय अशी भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. विमा संरक्षण असलेल्या आणि नसलेल्या शेतकऱ्यांच्या भातपीकाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावेत.
पावसाचा हंगाम चार महिन्यांचा असतो,पण हा पाऊस एका महिन्याने वाढला आहे. तो पाच महिने कोसळत आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे असे कापणी लायक आलेले भात पीक जमिनीवर भिडले आहे. त्यामुळे भात पीक नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंचनामे करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे अशी मागणी चेअरमन प्रमोद गावडे यांनी केली आहे.











