‘मंदार’च्या लेकीचे दैदिप्यमान यश’

सिद्धी शिंदे हिची भारतीय नौदलात निवड

चिपळूण (प्रतिनिधी) : मंदार एज्युकेशन सोसायटीचे सौ.शैलजा शिंदे वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कु. सिद्धी संतोष शिंदे (T.Y.B sc.) हिचा भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रांजणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद वरिष्ठ महाविद्यालय व एम.बी.ए. कॉलेजचे पर्यवेक्षक आर. डी. पाटील यांनी भूषविले.
या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व एम.बी.ए. कॉलेजचा प्राध्यापक वर्ग, वरिष्ठ आणि व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ.दीपा पाटील यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश कांबळी व एम.बी. ए. कॉलेजचे संचालक श्री. मिरजकर, तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक श्री.कुलकर्णी व नवले यांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या देदिप्यमान यशाचे संस्थेच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.