नेत्यांची नावे घेऊन काहीजणांकडून जनतेत संभ्रम
२९ रोजी करणार उमेदवारी अर्ज दाखल
सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात कोकणात महायुतीत नवचैतन्य पसरले असून कोकणातील सर्वच्या सर्व जागा महायुतीच्याच निवडून येतील. महायुती एकसंघ असून काहीजण नेत्यांची नावे घेऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर महाविकास आघाडीत अजूनही धूसपूस सुरू असल्याने काही जणांनी आधीच सावधगिरी बाळगत आपले उमेदवारी अर्ज गुपचूप पणे सादर केले असल्याची टीका दीपक केसरकर यांनी उबाटाचे उमेदवार राजन तेली यांचे नाव न घेता केली.
सावंतवाडी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख बबन राणे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महिला आघाडी प्रमुख ॲड. निता कविटकर, माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी महायुतीचा मेळावा सावंतवाडी येथे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार असून त्यानंतर मंगळवारी २९ रोजी महायुतीचे नेते सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
महाविकास आघाडीत तीव्र नाराजी पसरली आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी अर्चना घारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर राजन तेली यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यामुळे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज आहेत. अनेकांनी आपल्याशी संपर्क साधला आहे. लवकरच त्या पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या मतदारसंघात महिला उमेदवारी दाखल झाली असली तरीही महिला भगिनी खऱ्या अर्थाने महायुतीच्याच पाठीशी आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरण, मुलींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा योजना, मोफत तीन सिलेंडर, एसटी प्रवासामध्ये महिलांना ५० टक्के सवलत अशा अनेक योजना महिला भगिनींसाठी महायुती सरकारने आणल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर महिला खुश असून या निवडणुकीत देखील या लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.












