तळवली येथे राष्ट्र स्तरीय कृषियंत्रे, शक्ती साधनांमुळे होणाऱ्या अपघतांबाबत जनजागृती

 

गुहागर (प्रतिनिधी): आखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प ‘ कृषी आणि संबंधित क्षेत्रातील संबंधित श्रमविज्ञान आणि सुरक्षितता योजनेअंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व कृषी अभयांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली यांचे मार्फत दि. १७ ऑक्टोबर रोजी गुहागर तालुक्यातील तळवली बौद्धवाडी येथे राष्ट्रस्तरीय कृषियंत्रे व इतर शक्ती साधनांमुळे होणाऱ्या अपघतांबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रगतशील शेती करण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक कृषी साधने कोणती, त्यांचा वापर कसा करावा, ती कशी हाताळावी याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तर भातशेती लावणी यंत्र, नारळ काढणी यंत्र यांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. या यंत्रांचा वापर करून आपण आपला वेळ, श्रम, पैसा वाचवून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेऊ शकतो याविषयी उत्तम मार्गदर्शन करण्यात आले.

 

 

यावेळी सदरील महाविद्यालयांतील प्रमुख अन्वेषक डॉ. व्ही. व्ही. आवारे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. म. ल. जाधव, कर्मचारी प्रसाद होळकर, स्वरूप भाटकर हे उपस्थित होते. या जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी होऊन तळवली बौद्धवाडी येथील जवळपास 50 शेतकऱ्यांनी शेती यंत्रांची माहिती करून घेतली. तसेच तळवली येथे शेती यंत्रांसह येऊन येथिल शेतकरी ग्रामस्थांना माहिती दिल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत उपस्थित कर्मचारी व संबंधित महाविद्यालयाचे आभार मानले.