*दापोली प्रतिनिधी*- संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार म्हणून संतोष अबगुल यांनी आज विधानसभा निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज भरला आहे.
समस्या जिथे प्रतिष्ठान तिथे या टॅग लाईनवर काम करणारे दापोली-मंडणगड-खेड व रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संतोष अबगुल यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवतीर्थ दादर येथे नुकताच मनसेमध्ये प्रवेश केला असून त्यांना मनसेच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
संतोष अबगुल यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दापोली प्रांताधिकाऱ्यांकडे दाखल केला. अनेक सामाजिक कार्यामध्ये संतोष अबगुल यांचा हातखंडा असल्याने आता राजकीय जबाबदारी कशाप्रकारे पेलणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणतेही शक्तीप्रदर्शन केलेले नाही कारण शक्तीप्रदर्शन करताना जनतेला त्रास होऊ नये, अशाच पध्दतीने आपण आज विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री. संतोष अबगुल यांनी सांगितले.












