रत्नागिरी : प्रतिनिधी l वाहन निष्काळजीपणे तसेच बेदरकारपणे चालवून शोरुममधील वाहनांचे नुकसान करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने बुधवारी 6 महिन्याचा सश्रम कारावास आणि 6 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.ही घटना ६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी 2 वा.सुमारास आर. के. मोटर्स टि. व्ही. एस शोरुम एमआयडीसी मिरजोळे येथे घडली होती.
प्रशांत चव्हाण (२६, रा. एमआयडीसी, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.6 फेब्रुवारी रोजी प्रशांत आपल्या ताब्यातील वाहन ( एमएच-४६ -एबी -0107) हे आर. के. मोटर्स टी. व्ही. एस शोरुम प्लॉट नं ४२ एमआयडीसी-मिरजोळे येथे लागलेली आग विझवून परत वाहन घेऊन रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता गाडीच्या उजव्या बाजूचा मागील दरवाजाचे झडप उघडे ठेवून गाडी निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवत घेऊन जात होता.तेव्हा या गाडीच्या दरवाजाच्या उघड्या झडपाची शोरुम-गोडावूनच्या भिंतीला धडक बसली होती.ही धडक इतकी जोरदार होती की, शोरुमच्या भिंतीचे चिरे व सिमेंटचे ब्लॉक गोडावूनमध्ये असलेल्या नवीन टीव्हीएस कंपनीच्या गाड्यावर पडले. यामध्ये नऊ गाड्यांचे नुकसान झाले होते.
या प्रकरणी अमित चंदुलाल पटेल ( ३२, रा. भवानीनगर, खेडशीनाका- रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी भादवी कलम २७९, ४२७,मोटार वाहन अधिनियम १८४ अन्वये प्रशांत विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस फौजदार महेश टेमकर करत होते. तपासात पोलिसांनी संशयितास अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याचा निकाल बुधवारी न्यायाधीश माणिकराव सातव यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे ऍड.प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले त्यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने प्रशांतचे वय, परिस्थिती, आणि त्याचे करीअर बिघडू नये यासाठी सहा महिने सश्रम कारावास व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक दिनकर सुर्य आणि महिला पोलिस हवालदार संजीवनी मोरे, पोलिस उपनिरीक्षक सुनिल आयरे यांनी काम पाहिले.
वाहन चालकांसाठी न्यायालयाचा संदेश
चौकट –
जिल्ह्यात सरकारी किंवा सार्वजनिक वापराच्या वाहन चालकांनी त्यांच्या ताब्यातील वाहन चालवताना सुरक्षित व काळजीपुर्वक चालवण्याची खबरदारी घेतली पाहिजे.असा संदेश न्यायालय-१ न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी दिला आहे.