संगमेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाचे धुमशान; भातपिकाचे केले नुकसान

 

निलेश जाधव (देवरूख)

संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी दुपारनंतर परतीच्या पावसाने अक्षरशः धुमशान घातले. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली. या पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

दिवाळीच्या सणाचा उत्साह सगळीकडे आहे. त्यातच नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. मात्र परतीचा पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. हा पाऊस तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात पडत आहे. त्यामुळे कापणीयोग्य झालेले भातपिक पावसामुळे भिजत आहे. हा पाऊस एवढा जोरदार पडत असतो कि शेतात उभे असलेले भातपिक साफ आडवे होऊन जाते. एवढेच नव्हे तर पावसामुळे भातपिकाचा भिजून गोळा होतो. परिणामी शेतकऱ्यांना हे भातपिक कापताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. या परतीच्या पावसाचा फटका तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे ऐन कापणीवेळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

कापणीयोग्य झालेले भातपीक जमिनीवर पडून पुन्हा त्याला कोंब येत आहेत. या परिस्थितीमुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. सध्या परतीच्या पावसाचा हंगाम सुरू आहे. गेल्या आठवड्याभरात हा पाऊस सायंकाळी किंवा दुपारच्या सुमारास येतो. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडत असतो. भात कापणीचा हंगाम सुरू असताना परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतमळ्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. पावसामुळे भातशेती आडवी झाल्याने पावसाच्या पाण्यात भिजत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने ऐन भातकापणीवेळीच पाऊस पडल्याने भातपिक वाया जात आहे. परतीचा पाऊस असाच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडू शकते.